Parbhani Drought | टंचाई काळात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई: आमदार विटेकर यांचा इशारा

पाथरीच्या टंचाई आढावा बैठकीत गावनिहाय पाणीप्रश्नांचा आढावा; सहा महिने, वर्षभरापासून योजना बंद असल्याच्या तक्रारींवर पाणीपुरवठा विभागाला धरले धारेवर
Pathri Taluka Drought
पाथरी तालुक्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार राजेश विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक Pudhari
Published on: 
Updated on: 

Pathri Taluka Drought

पाथरी: यंदाची दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून, टंचाईच्या काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा अथवा हलगर्जीपणा करू नये. टंचाई निवारणाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीत दिरंगाई किंवा कामचुकारपणा आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आमदार राजेश विटेकर यांनी दिला. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या आश्वासनांवर नाराजी व्यक्त करीत त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

पाथरी तालुक्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी (दि. २०) अंजली मंगल कार्यालयात आमदार राजेश विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार माचेवाड, गटविकास अधिकारी ऋषिकेश सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर, मदनराव विटेकर, अण्णासाहेब रनेर, विलास बाबर, बाळासाहेब कोल्हे, अजिंक्य नखाते, बाजार समितीचे सभापती एकनाथ घाडगे, अनिल नखाते, सुरेश ढगे, दादासाहेब टेंगसे, विष्णू काळे, हसीब खान, शेखर सिद्दिकी, दीपक टेंगसे, मुंजाभाऊ कोल्हे, भगवान दुगाने, राजू ढगे आदींची उपस्थिती होती.

Pathri Taluka Drought
Parbhani News : सेलू कृषी अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला घातला पुष्पहार!

बैठकीत आमदार विटेकर यांनी तालुक्यातील गावनिहाय पाणीटंचाईचा आढावा घेतला. टंचाई निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पूर्णवेळ लक्ष द्यावे. केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या पाणीप्रश्नांची सोडवणूक करावी. टंचाईच्या काळात जबाबदारी झटकणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सहा महिने, वर्षभरापासून योजना बंद!

पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत बैठकीत अनेक गावांतील तक्रारी पुढे आल्या. काही गावांतील पाणीपुरवठा योजना सहा महिने, तर काही ठिकाणी वर्षभरापासून बंद असल्याचे सांगण्यात आले. मात्र, संबंधित अभियंत्यांकडून प्रत्येक वेळी आठ दिवसांत योजना सुरू करून देतो, असेच उत्तर दिले जाते. वारंवार आश्वासने देऊनही योजना सुरू होत नसतील, तर त्याचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित करीत आमदार विटेकर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

Pathri Taluka Drought
Parbhani News | पाथरीत शिंदे गटाला मोठा धक्का; दोन नगरसेवकांचे राजीनामे

रेनापूर येथील ग्रामसेवकाच्या कामकाजाबाबतही तक्रारी मांडण्यात आल्या. या तक्रारींची दखल घेत संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना आमदार विटेकर यांनी दिल्या.

डाव्या कालव्याच्या पाण्याबाबतही नाराजी

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या वितरणाबाबतही बैठकीत अनेक तक्रारी मांडण्यात आल्या. कालव्याचे पाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचते की नाही, वितरण व्यवस्थेतील अडचणी आणि पाणीवाटपातील समस्यांवर चर्चा झाली. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी संबंधित यंत्रणेने दक्षता घेण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.