Parbhani News | पाथरीत शिंदे गटाला मोठा धक्का; दोन नगरसेवकांचे राजीनामे

नगराध्यक्षांवर भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराचे आरोप; आमदार राजेश विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा
Pathri Municipal Council
Pathri Municipal Councilpudhari
Published on: 
Updated on: 

Pathri Municipal Council

पाथरी : पाथरी नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रभाग क्रमांक ७ मधील दोन्ही नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नगराध्यक्ष आसेफ खान शेरगुल खान यांच्यावर भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराचे गंभीर आरोप करत नगरसेविका आलम तरन्नुम बेगम मुजीब आणि नगरसेवक पठाण हसीब खान तहजीब खान यांनी गुरूवारी (दि. १२) जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र पत्राद्वारे बिनशर्त राजीनामे सादर केले आहेत. या घडामोडीमुळे पाथरीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नगरसेविका आलम तरन्नुम बेगम मुजीब या प्रभाग क्रमांक ७ मधील जागा अ (सर्वसाधारण महिला), तर नगरसेवक पठाण हसीब खान तहजीब खान हे जागा ब (सर्वसाधारण) मधून निवडून आले होते. दोघांनीही महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ४१ (२) चा संदर्भ देत जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामे सादर केले आहेत.

Pathri Municipal Council
Parbhani News : जलतारा अभियानाला परभणीत गती; पाच शोषखड्ड्यांचे खोदकाम

नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

राजीनामा पत्रांमध्ये नगराध्यक्ष आसेफ खान शेरगुल खान यांच्या कारभारावर गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. नळपट्टी, घरपट्टी, आठवडी बाजार, नामांतर तसेच जागा आणि गाळ्यांच्या भाड्यापोटी मिळणारी रक्कम नगरपरिषदेच्या अधिकृत खात्यात चलनाद्वारे जमा केली जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम स्वतःजवळ ठेवून वैयक्तिक कामांसाठी खर्च केली जात असल्याचा दावाही राजीनामा पत्रात करण्यात आला आहे.

याशिवाय नगरपरिषदेचा कारभार मनमानी पद्धतीने चालविला जात असून, काही महत्त्वाचे निर्णय घेताना पारदर्शकता राखली जात नसल्याची तसेच नियमांचे पालन होत नसल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. या आरोपांमुळे नगरपरिषदेतील अंतर्गत राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

Pathri Municipal Council
Parbhani News : टँकरच्या धडकेत १२ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू, दिवाळी सुट्टीत आला होता आजोळी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा

दरम्यान, राजीनामा दिलेले दोन्ही नगरसेवक आमदार राजेश विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. मात्र, पक्षप्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

दोन्ही नगरसेवकांचे राजीनामे जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृतरीत्या स्वीकारले जाणार का, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश कधी होणार आणि नगराध्यक्षांवरील आरोपांवर काय भूमिका घेतली जाणार, याकडे आता पाथरीकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या आरोपांवर नगराध्यक्ष आसेफ खान यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.