

Maharashtra Teacher BLO Duty Stress
डॉ. सचिन चिद्रवार
मानवत : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त मतदार पुनर्निरीक्षण (SIR-2026) मोहिमेमुळे राज्यातील हजारो शिक्षक-बीएलओ (Booth Level Officer) यांच्यावर कामाचा ताण निर्माण झाला आहे. नियमित अध्यापनाची जबाबदारी सांभाळतानाच मतदार यादीचे पुनर्निरीक्षण, घरभेटी, अर्ज व कागदपत्रांची पडताळणी, माहिती संकलन आणि रात्री उशिरापर्यंत ऑनलाइन माहिती अपलोड करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असल्याने अनेक शिक्षकांना दिवसाचे तब्बल १४ ते १६ तास काम करावे लागत आहे. परिणामी त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याची भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.
शासनाच्या निर्देशानुसार अनेक शाळा सध्या सकाळच्या सत्रात सुरू आहेत. त्यामुळे बीएलओची जबाबदारी नसलेल्या शिक्षकांचे अध्यापन दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्ण होत असून त्यानंतर त्यांना विश्रांती व कुटुंबासाठी वेळ मिळत आहे. मात्र बीएलओ म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांचे चित्र पूर्णपणे वेगळे आहे. सकाळचे अध्यापन संपताच त्यांना मतदारांच्या घरभेटी, अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची पडताळणी आणि माहिती संकलनाची कामे करावी लागतात. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ऑनलाइन माहिती नोंदवून अहवाल सादर करण्याची जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने सकाळ सत्राचा निर्णय त्यांच्यासाठी दिलासादायक न ठरता अतिरिक्त ताण वाढविणारा ठरत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये मतदार पुनर्निरीक्षणाच्या कामात अडथळा आणणाऱ्या किंवा सहकार्य न करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आवश्यकतेनुसार पोलिसांची मदत घेणे, नोटीस बजावणे, पंचनामा करणे तसेच कायद्यानुसार पुढील कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. या मोहिमेसाठी अतिरिक्त पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची विनंतीही करण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर बीएलओ शिक्षकांमध्ये कामाबरोबरच अतिरिक्त दडपण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
एकीकडे विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची जबाबदारी आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत पुनर्निरीक्षणाचे काम पूर्ण करण्याचे दडपण, अशा दुहेरी जबाबदारीमुळे बीएलओ शिक्षकांची मोठी मानसिक व शारीरिक दमछाक होत आहे. सकाळ सत्राचा निर्णय झाल्यानंतर बीएलओ नसलेल्या शिक्षकांवरील ताण काहीसा कमी झाला असला, तरी बीएलओ शिक्षकांवरील अतिरिक्त जबाबदारी अनेक पटींनी वाढल्याची भावना शिक्षक व्यक्त करत आहेत.
"आम्ही शिक्षक आहोत की पूर्णवेळ निवडणूक कर्मचारी?" असा संतप्त सवालही अनेक बीएलओ शिक्षक उपस्थित करत आहेत. सततची धावपळ, विश्रांतीचा अभाव आणि कुटुंबासाठी वेळ न मिळाल्याने मानसिक ताण, चिडचिड तसेच आरोग्याच्या समस्या वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
शिक्षण, निवडणूक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या एकाच वेळी सांभाळताना बीएलओ शिक्षकांवरील वाढता ताण शासनाने गांभीर्याने घेण्याची गरज असल्याची भावना राज्यभरातील शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षकांवर अतिरिक्त भार टाकण्याऐवजी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता, कामाचे योग्य नियोजन आणि वास्तववादी कालमर्यादा निश्चित करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
सकाळी ७.०० ते १२.०० – नियमित अध्यापन
दुपारी १२.०० नंतर – घरभेटी, फॉर्म संकलन व कागदपत्रांची पडताळणी
संध्याकाळ ते रात्री उशिरापर्यंत – ऑनलाइन माहिती नोंदणी व अहवाल सादर करणे
दिवसाचे १४ ते १६ तास काम
विश्रांतीचा अभाव, कौटुंबिक जीवनावर परिणाम आणि वाढता मानसिक ताण
बीएलओ शिक्षकांना नियमित अध्यापनातून तात्पुरती पूर्णवेळ सूट द्यावी.
दुपारच्या सत्रात इतर शिक्षकांची बीएलओ सहाय्यक म्हणून नियुक्ती करून कामाचे समान वाटप करावे.
मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेसाठी वास्तववादी नियोजन आणि पुरेसा कालावधी द्यावा.
शिक्षकांवरील मानसिक ताण लक्षात घेऊन मानवी दृष्टिकोनातून निर्णय घ्यावेत.
सकाळ सत्रामुळे वाढलेल्या अतिरिक्त कामाच्या ताणाचा फेरविचार करून बीएलओ शिक्षकांना आवश्यक दिलासा द्यावा.