Parbhani News : भारती कॅम्पमध्ये श्री संत गजानन महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत

परभणी जिल्ह्यात आगमन : गण गण गणात बोतेचा जयघोष; शेकडो भाविकांनी घेतले दर्शन
Parbhani News
Parbhani News : भारती कॅम्पमध्ये श्री संत गजानन महाराज पालखीचे जल्लोषात स्वागतfile photo
Published on
Updated on

Grand welcome for the Palkhi of Shri Sant Gajanan Maharaj at Bharati Camp

एरंडेश्वर, पुढारी वृत्तसेवा : शेगाव ते पंढरपूर या पवित्र वारी मार्गावरील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे शनिवारी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात असलेल्या भारती कॅम्प येथे उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखीच्या आगमनाची माहिती मिळताच परिसरातील तसेच पंचक्रोशीतील गावांमधून शेकडो भाविक सकाळपासूनच भारती कॅम्प येथे दाखल झाले होते. पालखीचे आगमन होताच संपूर्ण परिसर 'गण गण गणात बोते' या अखंड जयघोषाने दुमदुमला.

Parbhani News
Ashadhi Wari 2026 | शेगाव-पंढरपूर पालखीचे हट्टा येथे आगमन; "गण गण गणात बोते" जयघोषाने दुमदुमला परिसर

श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि फुलांची उधळण करून मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. पालखी मार्गावर विविध ठिकाणी भाविकांनी रांगोळ्या काढून तसेच पुष्पवृष्टी करत पालखीचे स्वागत केले. महिलांसह युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.

पालखीसमोर भजन, हरिनामाचा गजर आणि जयघोष सुरू असल्याने परिसरात आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळत होती. पालखीच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. अनेकांनी पालखीसमोर नतमस्तक होत आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

Parbhani News
Mahesh Landge : सहिष्णुता, नम्रता, शांतता आम्हीच बाळगायची का?

शेगावच्या श्री संत गजानन महाराजांविषयी असलेल्या भक्तांच्या अपार श्रद्धेचे दर्शन या स्वागत सोहळ्यात घडले. पालखीच्या आगमनामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असल्याचा अंदाज घेऊन पूर्णा पोलीस ठाण्याने विशेष बंदोबस्ताची व्यवस्था केली होती. पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी सिगणवाड, जमादार सुरेश राठोड, भगवान राठोड, श्याम काळे, शैलेंद्र टाकरस, वसंत राठोड, मोहिद पठाण यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. वाहतूक सुरळीत राहावी, भाविकांना दर्शनासाठी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे संपूर्ण स्वागत सोहळा अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

भारती कॅम्प येथे भाविकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे पालखी सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. स्वागतानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली असून, पालखीचा शनिवारी रात्रीचा मुक्काम त्रिधारा येथे झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांच्या पालखीला मिळालेला प्रतिसाद हा वारकरी परंपरेवरील श्रद्धा व भक्तीचा जिवंत प्रत्यय देणारा ठरला. भारती कॅम्प येथे पार पडलेला हा स्वागत सोहळा भक्ती, शिस्त व सामाजिक एकात्मतेचा प्रेरणादायी उत्सव ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news