

Parbhani Manwat ST Bus Bike Collision
मानवत : मानवत तालुक्यातील यशवाडी जवळ शनिवारी (दि.९) दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव एसटी बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात परभणी-मानवत राष्ट्रीय महामार्गावर दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.
अनिल लक्ष्मण जाधव (वय ५५) आणि आशामती अनिल जाधव (वय ५०, रा. खांडवीवाडी, ता. परतूर, जि. जालना) अशी मृत दांपत्याची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जाधव दांपत्य मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध त्रिमूर्ती हनुमान मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शन, कीर्तन आणि महाप्रसाद आटोपून ते आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच २० एफए ७५६८) गावी परतत होते. त्यावेळी परभणीहून बीडकडे जाणाऱ्या भरधाव एसटी बसने (क्र. एमएच १४ एमएच १५६१) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, बसने दुचाकीसह दांपत्याला तब्बल १०० ते १५० फूट अंतरापर्यंत फरपटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान, मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर अपघातांची मालिका सुरूच असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.