

पूर्णा ः तालुक्यातील आव्हई गावात शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे विदारक चित्र समोर आले. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून विहिरी, पाईपलाइन आणि घराघरांत नळजोडण्या देण्यात आल्या, मात्र विहिरींत मुबलक पाणीसाठा असूनही ग्रामपंचायतीच्या निष्क्रियता आणि हलगर्जीपणामुळे आजही गावातील नळ कोरडेठाक आहेत. परिणामी महिलांसह ग्रामस्थांना घागरी घेऊन पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून संतापाची लाट उसळली.
आव्हई गावातील नागरिकांना कायमस्वरूपी शुध्द पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केली. संबंधित ठेकेदाराने विहीर खोदकाम, पाइपलाइन टाकणे, नळ कनेक्शन फिटींग आदी सर्व कामे पूर्ण करून योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली. विशेष म्हणजे योजनेसाठी खोदलेल्या दोन्ही विहिरींत भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र ग्रामपंचायतीने अद्यापही नळांना पाणी सोडण्याची तसदी घेतली नाही. यामुळे शासनाचा निधी अक्षरशः पाण्यात गेल्याची भावना ग्रामस्थांत तीव्र झाली.
जलजीवनचे स्वप्न दाखवून गावकऱ्यांच्या नशिबी मात्र कोरडे नळ आणि रिकाम्या घागरी आल्याची बोचरी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांत नागरिकांची होणारी ही फरफट पाहून ग्रामस्थांत संताप उसळला. दरम्यान, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे तालुका प्रमुख गणेश बुचाले यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनावर लक्ष्मण बुचाले, सुदाम बुचाले, मनोहर बुचाले, गोपीनाथ बुचाले, नागोराव पवार, रावसाहेब बुचाले, गिज्ञानदेव पवार, संभाजी पवार, दिपक बुचाले, गोविंद बुचाले, सुभाष बुचाले, किशन बुचाले, राजेश आणि रमेश बुचाले, असंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात नमूद केले की, गावातील जलजीवनची सर्व कामे पूर्ण झाली असूनही ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.
यापूर्वी 13 मार्च रोजी गटविकास अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली होती. त्यावेळी संबंधितांना तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. ग्रामस्थांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले. तक्रारींची दखल घेण्याऐवजी नागरिकांनाच उध्दट वागणूक दिली जात आहे, असा संतप्त आरोप केला.
मराठा नेते सुभाष जावळे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, येत्या दोन दिवसांत गावाचा पाणीपुरवठा सुरू न झाल्यास उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
नळाजवळ चिमणीलाही पाणी नाही..
आव्हई गावात आज अशी परिस्थिती निर्माण झाली की, घराघरांत नळ आहेत, पण त्यातून पाण्याचा एक थेंबही येत नाही. विहिरी पाण्याने तुडुंब भरलेल्या असताना ग्रामस्थ मात्र तहानलेले आहेत. त्यामुळे धरण उशाला अन् कोरड घशाला या म्हणीचा प्रत्यय आव्हईकरांना अक्षरशः येत आहे. गावात वाढत चाललेल्या संतापामुळे प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.