

चारठाणा : जिंतूर तालुक्यातील चारठाणा मंडळातील कान्हा शिवारात शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी परभणी गुन्हा अन्वेशन विभाग व बामणी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकूण १६ किलो ४५५ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. त्यांची अंदाजे किंमत ८ लाख २२ हजार ७५० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी एका शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कान्हा शिवारातील शेत गट क्रमांक ३० मध्ये आरोपी संतराम नरसिंग दुबळकर (वय ४५, रा. कान्हा, ता. जिंतूर) याने ह॔ळदीच्या पिकात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी रात्री कारवाई केली.
पोलिसांना शेतातून पांढऱ्या रंगाच्या खताच्या पिशवीमध्ये ५ किलो २०० ग्रॅम, हिरव्या रंगाच्या खताच्या पिशवीमध्ये ४ किलो ८२४ ग्रॅम, तर पिवळ्या रंगाच्या खताच्या पिशवीमध्ये ६ किलो ४३१ ग्रॅम, असा एकूण १६ किलो ४५५ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.
या प्रकरणी बामणी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८ (फ), २०(ब) (ii) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलिस उप निरीक्षक प्रभोधन जोंधळे करीत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी, जिंतूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सुरवाडे, पोलिस हेड कॉन्सेटबल प्रभोधन जोंधळे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.