

परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुख्यमंत्री पदापासून पंतप्रधान पदापर्यंत तब्बल २५ वर्ष कुठलीही सुटी न घेता, अविरतपणे काम केले आहे. मोदी सरकारची ही लोकप्रियता विरोधकांना सहन होत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीतील जाहीर कार्यक्रमातून लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान या कालखंडाला २५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सेवा से समर्पण गौरव यात्रेची सुरुवात परभणीतून झाली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्टेडियम मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, एनडीएचे राजकारण हे विकासाचे असून इंडिया आघाडीचे राजकारण हे आंदोलनाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगभर वाढलेली लोकप्रियता इंडिया आघाडीला सहन होत नाही. त्यामुळे हे वारंवार आंदोलनाचे अस्त्र वापरत आहेत, परंतु त्यांची नौटंकी जनतेला माहीत झाल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
यापूर्वी शिवसेनेचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र राहिले होते. परंतु पुढील काळ शेतकरी, लाडक्या बहिणींसाठी १०० टक्के समाजकारण करण्यात येणार आहे. कोणीही माईचा लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, याचा पुनर्उच्चारही शिंदे यांनी केला.
पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करावे
शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांसाठी काम करावे, उठसूठ मुंबईला येण्याची घाई करू नये. जे पदाधिकारी केवळ मुंबईला चकरा मारतात, त्यांना आपण दुष्काळग्रस्त परिस्थितीत तू शेतकर्यांसाठी काय केलेस ते अगोदर सांग, असा सवाल करणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजन संजय जाधव यांनी केले होते.