

Purna Gaur Govindpur Farm Road Encroached
पूर्णा : तालुक्यातील गौर-गोविंदपूर शिवारातील अतिक्रमणामुळे बंद झालेला शिवरस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी शेतकरी निवृत्ती ढोणे आणि ज्ञानदेव सोलव यांनी सुरू केलेले उपोषण बुधवारी (दि. ७) दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. मंगळवारी (दि. ६) दोन्ही शेतकऱ्यांनी थेट बैलगाडीसह बांधावर बसून उपोषणाला सुरुवात केली होती.
दरम्यान, तहसीलदार माधवराव बोथीकर, तलाठी गिराम आणि शिरपलवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. अतिक्रमण करून बंद करण्यात आलेल्या शिवरस्त्याच्या दोन्ही बाजूंची पाहणी केल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी शिवरस्त्याच्या काही भागाबाबत तोडगा काढण्यात यश आले. मात्र, उर्वरित भागातील रस्ता खुला करण्यास संबंधित शेतकरी तयार न झाल्याने संपूर्ण प्रश्नावर तोडगा निघू शकला नाही.
संपूर्ण अतिक्रमणग्रस्त शिवरस्ता खुला होत नाही, तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहील, असा निर्धार निवृत्ती ढोणे आणि ज्ञानदेव सोलव यांनी व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षांपासून शिवरस्ता खुला करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करीत आहोत. मात्र, रस्त्याअभावी शेती करणे कठीण झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
तहसीलदार बोथीकर यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले. शिवरस्ता खुला करण्यासाठी स्थानिक तहसीलदार अथवा उपविभागीय महसूल न्यायालयात सुनावणी अर्ज दाखल करावा लागेल. त्यानंतर रस्ता अडविणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा बजावून सुनावणीसाठी हजर करण्यात येईल. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शेतवहिवाटीसाठी रस्ता खुला करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सरपंच उत्तमराव ढोणे, तुकाराम ढोणे, अंगद पाटील यांच्यासह परिसरातील अन्य शेतकरी उपस्थित होते.