

Manakeshwar woman and child found dead
जिंतूर : जिंतूर–येलदरी मार्गावरील माणकेश्वर येथे विहिरीत एका विवाहितेसह दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना आज (दि. 13) उघडकीस आली.
याबाबत अधित माहिती अशी की, बामणी येथील गोविंदराव जिजाराव जाधव यांची मुलगी शारदा हिचा विवाह चार वर्षांपूर्वी जांभोरा (ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) येथील भारत देशमुख यांच्याशी झाला होता. शारदाला तीन वर्षांचा आदर्श नावाचा मुलगा आहे.
10 ऑगस्ट रोजी शारदा देशमुख पती आणि मुलासह रक्षाबंधनानिमित्त बामणी येथे भावाकडे येत होती. येलदरीजवळील माणकेश्वर येथे बस बदलण्यासाठी ते थांबले होते. बस उशिरा आल्याने त्यांनी महादेव मंदिरात दर्शनासाठी गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आज माणकेश्वर येथील शेतकरी अशोक काकडे यांच्या विहिरीत शारदा आणि तिचा मुलगा आदर्श यांचे मृतदेह तरंगताना दिसले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहांची ओळख पटवली.
या घटनेची माहिती बामणी येथील दीपक देशमुख यांनी जिंतूर पोलिस ठाण्याला दिली. त्यानंतर एपीआय पुंड, जमादार दत्तात्रेय गुगाणे, यशवंत वाघमारे आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि जागेवरच डॉक्टरांच्या मदतीने पोस्टमार्टम करण्यात आले पुढील तपास पोलीस करत आहेत.