

Man attempts jump over water pot
परभणी : तालुक्यातील पेडगाव येथील पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. गेल्या मंगळवारी महिलांसाठी नागरिकांनी घागर मोर्चा काढून ग्रामपंचायतला कुलूप ठोकले होते. यातच गुरुवारी (दि.१) गणेश देशमुख यांनी जलकुंभावर चढून तेथून उडी मारून जीवन संपविण्याची धमकी दिली. यावेळी पोलीस व ग्रामसेवक यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
तालुक्यातील पेडगाव येथील पाणीप्रश्न अनेक दिवसापासून गंभीर बनला. हंडाभर पाण्यासाठी महिला व नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. याच प्रश्नावरून मंगळवारी पेडगाव येथील ग्रामस्थ व महिलांनी घागर मोर्चा काढत ग्रामपंचायतला कुलूप ठोकले होते.
प्रशासनाने उपाययोजना न करता उलट आंदोलकावरच शासकीय कामात अडथळा आणण्याचे गुन्हे दाखल केल्याने नागरिकात संतापाची लाट उसळली. यातूनच गुरुवारी (दि.१) गणेश देशमुख यांनी जाहीर केल्याप्रमाणे पाण्याच्या टाकीवर जाऊन उडी मारून जीवन संपवण्याचा निर्धार बोलून दाखवला. ही माहिती समजताच गावातील नागरीक, ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक डोंगरे तसेच ग्रामसेवक पवार यांनी पाण्याच्या टाकीकडे धाव घेत पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल असे लेखी आश्वासन देऊन गणेश देशमुख यांना जलकुंभावरून खाली उतरण्याची विनंती केली व त्यांनी एक तासानंतर आंदोलन मागे घेतले.
नागरिकांच्या समक्ष गणेश देशमुख यांच्या सर्व मागण्या मान्य करत आजपासूनच गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल असा शब्द ग्रामविकास अधिकारी पवार यांनी दिला. ग्रामपंचायतच्या पार पडलेल्या बैठकीत ग्रा.पं. मधील सेवक राजेश नंद यांनी आपल्यावर दबाव टाकून आंदोलकावर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले,असे पोलीस अधिकाऱ्यांसमक्ष सांगितले. आंदोलक गणेश देशमुख व शेख सादेक यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते तात्काळ मागे घेऊ असा शब्द पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी दिला.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुहास देशमुख, राजू देशमुख, अब्दुल हाफिज, ग्रा.पं.सदस्य विलासराव देशमुख, अभय देशमुख, मोबाईल कुरेशी, शेख खलील, संजय गायकवाड, तात्याराव वरकड, अनिल असोरे, श्रीधर देशमुख, शेख शगीर, शेख सादेक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.