

Police handed over three boys who had run away from the hostel to their parents
चारठाणा, पुढारी वृत्तसेवा: अकोली येथील वस्तीगृहातून पळून गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांना मध्यरात्री नांदेड-संभाजीनगर महामार्गावर नागरिकांनी हेरले. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्याने रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलिसांनी तिन्ही मुलांना सुरक्षितपणे ताब्यात घेत त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे मुलांना सुखरूपपणे कुटुंबीयांकडे पोहोचविण्यात यश आले.
6 सप्टेंबरच्या मध्यरात्री अमजद पठाण, इमरान शहा व अक्रम मिर्झा हे चित्रपट पाहून चारठाण्याकडे येत होते. मालेगाव व खडक पाटीच्या दरम्यान नांदेड-संभाजीनगर महामार्गावरील मालेगाव पाटीजवळ त्यांना तीन लहान मुले आढळून आली. अक्षय वाकळे (वय 10), सूरज मोरे (वय 11) व पिराजी वाघ (वय 10) अशी या मुलांची नावे आहेत.
तिन्ही मुलांनी चारठाण्याकडे जाण्यासाठी लिफ्ट मागितली. त्यांच्याशी चौकशी केली असता ते अकोली येथील वस्तीगृहातून पळून आल्याचे समोर आले. तसेच जिंतूर तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले. मध्यरात्री महामार्गावर तीन अल्पवयीन मुले एकटी असल्याने अमजद पठाण यांनी तातडीने चारठाणा ठाण्याचे सपोनि बालाजी पुंड यांना दूरध्वनीवरून माहिती दिली.
दरम्यान, रात्रीची गस्त घालत असलेले पोलिस उपनिरीक्षक खरात व त्यांचे पथक पोलिस वाहनातून परिसरात गस्त घालत होते. नागरिकांनी पोलिसांचे वाहन थांबवून तिन्ही मुलांबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलांना सुरक्षितपणे पोलिस वाहनातून चारठाणा ठाण्यात आणले. पोलिसांनी मुलांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्यासाठी आसाराम जाधव व सुनील वाघ यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून मुलांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली.
त्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून तिन्ही मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. मध्यरात्री महामार्गावर तीन अल्पवयीन मुले एकटी आढळून आल्यानंतर त्यांची चौकशी करून पोलिसांना माहिती देणाऱ्या अमजद पठाण, इमरान शहा व अक्रम मिर्झा यांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे. तसेच रात्रीची गस्त घालत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक खरात व त्यांच्या पथकाने तातडीने दखल घेतल्याने तिन्ही मुले सुखरूपपणे पालकांपर्यंत पोहोचली.