

Parbhani: Jambhulabet on the verge of extinction due to floods
मदन आंबोरे
ताडकळस : गोदावरी नदीच्या पात्रात वसलेले आणि निसर्ग सौंदयनि नटलेले जाभुळबेट हे पर्यटन स्थळ सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर असून, स्थानिक नागरिक व निसर्गप्रेमींकडून तातडीने संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.
ताडकळस गावापासून १० किमी. अंतरावर पूर्णा व पालम तालुक्यांच्या सीमेवरील गोदावरी नदीच्या मध्यभागी वसलेले हे बेट काही वर्षांपासून मोठ्या संकटात सापडले आहे. सप्टेंबर २०२४ मधील अतिवृष्टी आणि नाथसागरासह इतर धरणांतून करण्यात आलेल्या पाण्याच्या मोठ्या विसर्गामुळे गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे या बेटाचा मोठा भूभाग पुराच्या पाण्यात खचला, सुपीक माती वाहून गेली, आणि असंख्य वृक्ष उन्मळून पडले. गेल्या काही वर्षांत कृषीभूषण कांतराव देशमुख झरीकर यांच्या प्रेरणेतून आणि स्थानिक संवर्धन समितीच्या माध्यमातून या बेटाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे.
शेकडो तरुणांनी झाडे लावणे, स्वच्छता मोहीम, जैव विविधतेचे संरक्षण यासाठी योगदान दिले आहे. मात्र शासनाकडून कोणताही ठोस निधी किंवा योजना न मिळाल्याने हे प्रयत्न अर्धवटच राहिलेले आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, इतरत्र विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च होतात, मात्र जांभुळ बेटाच्या संवर्धनासाठी केवळ आश्वासनेच मिळत असतात.
वेळेवर संवर्धनासाठी उपाययोजना केल्या असत्या तर आज है संकट ओढवले नसते, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. फळा, गोळेगाव, आरखेड, मुंबर, देऊळगाव दु. अशा आसपासच्या गावांतील नागरिक आणि मोतीराम महाराज संस्थान यांच्याकडूनही या संवर्धन मोहिमेला पाठिंबा मिळत आहे. मात्र शासन आणि प्रशासन यांचे लक्ष केंद्रीत न झाल्यास लवकरच हा नैसर्गिक व धार्मिक वारसा पूर्णपणे नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कधीकाळी सुमारे ३० एकरांवर पसरलेल्या जांभुळ बेटाचे क्षेत्रफळ आता केवळ २० एकरांवर आलेले आहे. बेटावरील पुरातन मारोती मंदिर, दुर्मीळ औषधी वनस्पती, विविध फळझाडे आणि पक्ष्यांचे निवासस्थान या ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालणारे घटक होते. त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांसह संशोधकांचे आणि निसर्गप्रेमींचे आकर्षण बनलेले होते ते आता दुर्मिळ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.