Parbhani Crime | पूर्ववैमनस्यातून थारने दिली बुलेटला धडक; युवकाचा मृत्यू, १४ जणांवर खुनाचा गुन्हा

काही दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा करताना झालेल्या वादातून दोन्ही गटांमध्ये हाणामारी
Gaur Purna Road Accident
Gaur Purna Road Accident Pudhari
Published on
Updated on

Gaur Purna Road Accident

पूर्णा : पूर्णा तालुक्यातील गौर-पूर्णा मुख्य मार्गावर भरधाव थार वाहनाने बुलेट दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ३१ जुलै रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता घडली. या प्रकरणी पूर्ववैमनस्यातून कट रचून खून केल्याचा आरोप करत चुडावा पोलिसांनी १४ जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मृत युवकाचे नाव संतोष बालाजी सावळे (वय २८, रा. गौर, ता. पूर्णा, जि. परभणी) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष सावळे हे आपल्या बुलेट दुचाकीवरून गौर येथून पूर्णा शहराच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या काळ्या रंगाच्या थार वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की संतोष सावळे रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Gaur Purna Road Accident
Parbhani roads : कुशीनगर-वांगी रस्‍त्‍याची दुरवस्‍था; प्रशासनाच्‍या आश्वासनाचा फज्‍जा

अपघातानंतर बुलेट दुचाकी थारच्या पुढील भागात अडकली असूनही चालकाने वाहन न थांबवता ती काही अंतर फरफटत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. धनगर टाकळी फाटा परिसरातील समृद्धी महामार्गावरील मोंटेकार्लो प्रकल्प कार्यालयासमोर वाहन उभे करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक चिखले, पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे, चुडावा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे तसेच अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपासाची सूत्रे हाती घेतली. दरम्यान, थार वाहनाचा चालक पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतला.

Gaur Purna Road Accident
Jintur Parbhani highway accident : जिंतूर-परभणी महामार्गावर एसटीचा भीषण अपघात; ५१ प्रवासी थोडक्यात बचावले

या प्रकरणी मयताच्या आई शिलाबाई बालाजी सावळे यांनी चुडावा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सुशील केशव पारवे, रितेश काळबांडे, दीपक भगवान पारवे यांच्यासह एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे करीत आहेत.

पूर्वीच्या वादातून कट रचल्याचा आरोप

फिर्यादीनुसार, काही दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा करताना झालेल्या वादातून दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली होती. त्या घटनेनंतर परस्परविरोधी गुन्हेही दाखल झाले होते. त्याच वादाचा राग मनात ठेवून आरोपींनी कट रचत संतोष सावळे यांच्या बुलेटला थार वाहनाने मुद्दाम पाठीमागून धडक देऊन त्यांचा खून केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलिसांकडून या सर्व आरोपांच्या अनुषंगाने सखोल तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news