

जिंतूर : जिंतूर-परभणी महामार्गावरील चांदज गावाजवळ गुरुवारी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. संभाजीनगरहून वसमतकडे जाणारी वसमत आगाराची एमएच-२० बीएल-२२४० क्रमांकाची एसटी बस अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूला खाली जाऊन पलटी झाली. अपघाताच्यावेळी बसमध्ये ५१ प्रवासी प्रवास करत होते.
बस पलटी होताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले आणि तत्काळ बचावकार्य सुरू केले. अपघातात अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. बसचे चालक जी. एस. नागरगोजे (क्र. २२८०१) आणि वाहक पी. एम. गोरे (क्र. ८८७०) हे अपघातातून बचावले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाचे जिंतूर आगार प्रमुख गिलचे, विभागीय वाहतूक अधिकारी संदीप साळुंखे, लेखाकार पांचाळ, वाहतूक लिपिक गजानन घुगे आणि अतुल जैन यांनी घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. जखमी प्रवाशांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी त्यांनी आवश्यक ती व्यवस्था केली. अपघातामुळे काही काळ जिंतूर-परभणी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे वाहतूक नंतर सुरळीत करण्यात आली.
अपघातग्रस्त एसटीचे चालक नागरगोजे यांनी असे सांगितले की आम्ही संभाजी नगर मुक्काम करून वसमतकडे निघालो असता प्रवासा दरम्यान गाडीला ब्रेक कमी असल्याचे जाणवले. तेव्हा जिंतूर आगारात ब्रेक सेट केले.पुढे वसमत कडे मार्गस्थ होत असताना जिंतूर परभणी दरम्यान रामदास जवळील गावाजवळ एक वाहन पुढे असल्याने ब्रेक लावून गाडी बाजूला घेत उभी केली असताना रस्त्याच्या काठावरील शेत जमीन पावसाने कमकुवत असल्याने जमीन दबत:दबत गाडी शेतात डाव्या बाजूने कोसळली व अपघात झाला. असे चालकांनी स्पष्टीकरण दिले.