

Gangakhed Scrap Godown Fire
गंगाखेड : शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी (दि.१९) सकाळी भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकाजवळ सोहेल कुरेशी यांचे भंगाराचे गोदाम आहे. शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास गोदामाजवळ साचलेल्या कचऱ्याला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीने अल्पावधीतच शेजारील भंगार गोदामाला विळखा घातला. गोदामात मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आग झपाट्याने पसरली.
या आगीत गोदामातील मोठ्या प्रमाणातील भंगार साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच गोदामालगत असलेल्या राजाभाऊ रुस्तुम गुंड यांच्या घरालाही आगीचा फटका बसला. घटना घडली तेव्हा घरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, घरातील मोटारसायकल, संसारोपयोगी साहित्य आणि काही रोख रक्कम आगीत नष्ट झाल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच गंगाखेड नगर परिषदेचे अग्निशमन दल, पालम नगर परिषदेचे अग्निशमन दल तसेच जी-सेव्हन साखर कारखान्याचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.
दरम्यान, नगरसेवक शेख साबिर, सुनील चौधरी, अब्दुल रहमान कुरेशी, इरफान खान, सय्यद झहीर, शेख अखिल यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही आग विझविण्यासाठी आणि बचावकार्यात महत्त्वाची मदत केली.
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीचा अंतिम तपशील प्रशासनाच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.