

परभणी : जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना कथित संरक्षण दिल्याच्या गंभीर आरोपांमुळे स्थानिक गुन्हे शाखेवर (एलसीबी) मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना तातडीने नांदेड येथील नियंत्रण कक्षात संलग्न केले असून शाखेत कार्यरत इतर आठ अंमलदारांनाही परभणी पोलीस मुख्यालयात संलग्न केले. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली असून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे दि.१६ जून रोजी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांबाबत गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीत जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूक, उत्खनन तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांना स्थानिक गुन्हे शाखेतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेषतः जिल्ह्यात अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू राहण्यामागे संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका असल्याचा मुद्दा तक्रारीत उपस्थित करण्यात आला होता.
या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस उपमहानिरीक्षकांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. सदर प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. चौकशी दरम्यान संबंधित अधिकारी आणि अंमलदारांच्या कामकाजाची तपासणी करण्यात येणार असून आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास पुढील कठोर कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे. चौकशी प्रक्रियेवर कोणताही परिणाम होऊ नये तसेच तपास निष्पक्षपणे पार पडावा यासाठी पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांना परभणीतून दूर करून नांदेड नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेतील अन्य आठ अंमलदारांनाही पोलीस मुख्यालयात वर्ग करण्यात आले आहे. एका तक्रारीच्या पार्श्वभूमीवर एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली ही कारवाई पोलीस विभागात चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायां विरोधात कठोर मोहीम राबविण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. अवैध वाळू उत्खनन, वाहतूक, जुगार, मटका, अवैध दारू विक्री आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करून त्यांचे संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे नांदेड परिक्षेत्र कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
परभणी जिल्ह्यात काही महिन्यांपासून अवैध व्यवसायांच्या वाढत्या प्रमाणाबाबत विविध स्तरांतून नाराजी व्यक्त होत होती. अशा परिस्थितीत स्थानिक गुन्हे शाखेवरच संशयाची सुई फिरल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले. आता अपर पोलीस अधीक्षकांच्या चौकशीतून नेमकी वस्तुस्थिती समोर येणार असून चौकशी अहवालानंतर आणखी काही मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अवैध धंदे नेस्तनाबूत करण्याचे आदेश
परभणी जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय मोडून काढण्यासाठी पोलीस यंत्रणेला स्पष्ट निर्देश देण्यात आले. अवैध वाळू वाहतूक, उत्खनन, जुगार, मटका, अवैध दारू विक्रीसह इतर बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे नांदेड परिक्षेत्र कार्यालयाने म्हटले आहे. अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी पोलीस प्रशासन कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चारही करण्यात आला आहे.