Farmers Protest Purna | ओला दुष्काळ जाहीर करा; पूर्णा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा
Bullock Cart March Purna Tehsil Office
पूर्णा: तालुक्यातील सहा महसूल मंडळांमध्ये सप्टेंबर महिन्यात वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परंतु, महसूल व कृषी प्रशासन तसेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष गेल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.२९) पूर्णा तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा काढला.
हजारो शेतकरी व शेकडो बैलगाड्यांसह निघालेल्या या मोर्चात ओला दुष्काळ जाहीर करा, पिकविमा भरपाई द्या, कर्जमाफी करा अशा मागण्यांचे जोरदार घोषवाक्ये देण्यात आली. या वेळी शेतकरी नेते नरेश जोगदंड, माणिकराव सुर्यवंशी, शिवहार सोनटक्के, मुंजाभाऊ जोगदंड, माधुरी क्षिरसागर, नामदेव कदम, भोसले, सैनाजी माठे, किशोर ढगे यांनी प्रशासन आणि सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला.
अतिवृष्टीमुळे खरीपातील पिके उद्ध्वस्त झाली, जमिनी वाहून गेल्या, घरे पडली, संसारोपयोगी वस्तू व जनावरे वाहून गेली. या संकटामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येच्या मार्गाकडे वळू लागल्याचे नेत्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी आरोप केला की शासनाने मदतीसाठी केवळ दोन हेक्टरची मर्यादा ठेवून अनुदानाची रक्कम १३,५०० रुपयांवरून ८,५०० रुपयांवर आणली. तसेच पिकविमा योजनेतील जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळण्याची शक्यता नाही. महसूल प्रशासन पिकांचे केवळ ६० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल देत आहे; मात्र खरी परिस्थिती शंभर टक्के बाधित पिकांची आहे, असा दावा करण्यात आला.
तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. "शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून पीकविमा भरपाई, कर्जमाफी व शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल," असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

