

Dharamshala dispute Purna
पूर्णा: शहरातील डॉ. झाकीर हुसैन चौक येथे निजामकालीन काळापासून अस्तित्वात असलेली सार्वजनिक धर्मशाळा मुसाफिर व सुफीसंतांसाठी महत्त्वाचा निवारा ठरली होती. मात्र, कोरोना काळात निर्बंधांमुळे मुसाफिरांची वर्दळ बंद झाल्याचा फायदा घेत लगतच्या एका खाजगी शिक्षण संस्थेने धर्मशाळेवर कब्जा केला.
धर्मशाळा खुली करून तिची दुरुस्ती, वीज व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी नागरिक व मुसाफिरांकडून करण्यात आली होती. मात्र नगर परिषदेने २००९ मध्ये घेतलेल्या ठरावानुसार ही जागा झाकीर हुसैन शाळेला भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, २०१९ पर्यंत मुसाफिरांनी या धर्मशाळेचा वापर निवाऱ्यासाठी केला होता. त्यामुळे मागील तारखेला घेतलेला ठराव बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाने १५ सप्टेंबर रोजी पालिका प्रशासनाला इशारा दिला होता. तरीही कारवाई न झाल्याने २२ सप्टेंबरपासून मुसाफिरांनी भिक्षा मागून आंदोलन सुरू केले आहे. दिवसभर शहरात व शासकीय कार्यालयांमध्ये फिरून ते भिक्षा मागत आहेत.
मुसाफिर बांधवांनी पालिका प्रशासनाने धर्मशाळा खाजगी शिक्षण संस्थेच्या ताब्यातून मुक्त करून पुन्हा मुसाफिरांच्या ताब्यात द्यावी, अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा लवकरच मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.