

आनंद ढोणे
पूर्णा: तालुका परिसरातील कात्नेश्वर, पूर्णा, लिमला, ताडकळस, चुडावा, कावलगाव या सहा ही महसूल मंडळात शुक्रवारी (दि.२६ सप्टें.) रोजी मध्यरात्रीनंतर जोरदार मुसळधार पाऊस सुरु झालू आहे. तो शनिवारी (दि.२७) अद्याप कायम आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे गोदावरी, पूर्णा या मोठ्या नद्यासह सर्वच शेतशिवारातून छोटमोठ्या उपनद्या पुराच्या पाण्याने दुथडी भरुन वाहताहेत. परिणामी ह्या नद्यांनी धोक्याचे पात्र ओलांडले असून पुराचे पाणी कुठे शेतशिवारात तर काही ठिकाणी गावात शिरलेय.
सगळीकडे शेत शिवारात पाणीच पाणी होवून शिवारं जलमय झालेत. पिके पुन्हा एकदा पाण्याखाली बुडाली आहेत. ब-याच ठिकाणी शेतात अखाड्यावर जनावरांना चारावैरण करण्यासाठी गेलेले शेतकरी तिथेच अडकून पडलेत. त्याचबरोबर ब-याच ठिकाणी नदी पुराचे पाणी पुलावरुन वाहत असल्यामुळे तेथील वाहतूक मार्ग पोलीस प्रशासनाने बंद केलेत. या मध्य चुडावा-पूर्णा-वसमत हा मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव सध्या बंद केला आहे. तसेच पूर्णा ते झिरोफाटा मार्ग देखील माटेगाव जवळील नदीला पुर आल्यामुळे बंद केलाय.
शिवाय धानोरा काळे येथील जुन्या पुलावरुन गोदावरीचे पाणी वाहू लागल्याने तोही रस्ता धोका टाळण्यासाठी सा बां विभागासह सपोनि गजानन मोरे यांनी बंद केलाय. या व्यतिरिक्त चुडावा गावाजवळील नदीला मोठा पूर आला असता नदी किनारी अखाड्यावर सकाळी चारावैरण करुन दुध काढण्यासाठी शेतकरी निवृत्ती हिरामण हातागळे हे गेले होते. इतक्यात नदीला मोठा पूर येवून ते पुराच्या पाण्यात वेढल्या जावून अडकले होते. त्यांना व एका म्हैशीला महसूल व पालिका अग्निशमन दलाच्या आपत्ती व्यवस्थापन टिमने बोटीव्दारे सुखरुप बाहेर काढले. तसेच सोनखेड पांढरी गावाला खेटून असलेल्या नदीला पूर येवून पाण्याने संपूर्ण गावाला वेढा घातला. त्यात ग्रामस्थांचा पुर्णपणे संपर्क तुटला.
गावातील अनेक घरात पाणी शिरुन कपडे अन्नधान्याचे नुकसान झाले. त्याचबरोबर आहेरवाडी गावाला देखील नेहमीप्रमाणे थुना नदीला पूर आल्याने सगळीकडे पाणी येवून गावाला वेढा घातला असून संपर्क तुटला आहे. एरंडेश्वर येथील थुना नदीला मोठा पूर येवून पाण्याने गावाला वेढा घातला असून एका शेतकऱ्याच्या दोन म्हशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रुपला शिवारातील रेल्वे लोहमार्ग भुयारी पुलाखाली पाणी आल्यामुळे वसमत मार्ग बंद झाला.
तसेच पुनर्वसीत निळा महागाव कळगाव संयुक्त वस्ती परिसरात ढगफुटी सदृष्य मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे तेथील अनेकांच्या घरात पाणी शिरुन संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले. नागरिकांना अन्यत्र सहारा दिला जात आहे. तसेच येथील वस्तीवरील शासनाने बांधकाम केलेले घरांच्या छतांची गळती होत असल्याने घरात झरे सुरु झालेत. त्यामुळे महिलांसह नागरीकांचे मोठे हाल होत आहेत. एकंदरीत सर्वच ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार अतिवृष्टी संततधारपणे चालू झाल्यामुळे सर्वत्र पुराच्या पाण्याने हाहाकार उडाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, अतिवृष्टी व पुर परिस्थितीमुळे कुठे जर नैसर्गिक आपत्ती ओढावली तर महसूल व पोलीस प्रशासन काही अनूचित प्रकार घडला. तर त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी उपविअ. डॉ. जिवराज डापकर, तहसीलदार माधवराव बोथीकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, उपोअ डॉ समाधान पाटील, पोनि विलास गोबाडे, सपोनि सुशांत किनगे, सपोनि गजानन मोरे,न प पालीका अग्निशमन नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन बंब कर्मचारी हे सतर्क झाले असल्याचे कळते.