

पूर्णा : तालुक्यातील गोविंदपूर-गौर येथील अतिक्रमणामुळे बंद झालेला शिवरस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी दोन शेतकऱ्यांनी मंगळवारी (६ ऑक्टोबर) सायंकाळी ४ वाजल्यापासून बैलगाडीसह शेताच्या बांधावर आमरण उपोषण सुरू केले आहे. निवृत्ती धोंडीराम ढोणे (रा. पांगरा) आणि ज्ञानदेव नारायण सोलव (रा. बरबडी) अशी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
गोविंदपूर-गौर परिसरातील शिवरस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी शेती करण्यास सुरुवात केल्याने रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून शेतीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. शिवरस्ता बंद असल्याने परिसरातील सुमारे १५ ते २० एकर शेतीची मशागत करून पिके घेणे कठीण झाले आहे.
संबंधित शेतकरी मागील २४ वर्षांपासून पूर्णा तहसील कार्यालयाकडे अर्ज व निवेदने देऊन हा शिवरस्ता खुला करण्याची मागणी करीत आहेत. मात्र, महसूल प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या मागणीसाठी वारंवार तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी शेतातच उपोषण सुरू केले आहे.
परिसरात सध्या कोरड्या दुष्काळाचे सावट असतानाही शेतकरी भर उन्हात आपल्या हक्काच्या शेतरस्त्यासाठी आंदोलन करीत आहेत. या भागातील अनेक शेतकरी पाइपलाइनद्वारे बागायती सिंचन करून ऊस, हळद यांसारखी पिके घेतात. मात्र, शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने त्यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.
दरम्यान, यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शिवरस्त्यावर अतिक्रमण झाल्याची पाहणी केली होती. मात्र, त्यानंतर पुढील कार्यवाही न झाल्याने हा रस्ता अद्याप खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. अतिक्रमण करून शिवरस्ता बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अतिक्रमण करणाऱ्यांचे मनोबल वाढले असून ते उलट दादागिरीची भाषा करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अनेकदा अर्ज व निवेदने देऊनही महसूल प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने शेतरस्त्याअभावी शेती कसण्याऐवजी ती पडिक ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आता महसूल प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन शिवरस्ता खुला करण्याबाबत काय भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.