

सोनपेठ : गंगाखेड तालुक्यातील ब्रम्हनाथ वाडी शिवारात शेतजमिनीच्या जुन्या वादातून एका ६३ वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. १४ जून) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून गौडगाव येथील भाऊसाहेब किशनराव जाधव (वय ६३) यांचा ब्रम्हनाथवाडी शिवारातील शेतजमिनीच्या हद्दीचा व मालकीचा वाद मागील काही वर्षांपासून सुरू होता. रविवारी दुपारच्या सुमारास भाऊसाहेब जाधव शेतात असताना संबंधित व्यक्ती शेतालगतचे खांब ओढून नेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी आपल्या मुलासह नातेवाईकांना दूरध्वनीद्वारे तातडीने शेतात येण्यास सांगितले. मात्र, मुलगा व नातेवाईक घटनास्थळी पोहोचले असता भाऊसाहेब जाधव हे शेताच्या धुऱ्याजवळ गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यांच्यावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, पोलीस निरीक्षक अशोकराव गिते, पोलीस उपनिरीक्षक अजय किरकन, भूषण कांबळे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस कर्मचारी सुनील गिरी, राजेश मस्के, भागवत हुंडेकर, हनुमंत पौळ, चालक गणेश नाटकर व शेख कलिंदर यांनीही तपास कार्यात सहभाग घेतला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.