

परभणी : तालुक्यातील धर्मापुरी येथे दारुच्या नशेत झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मित्रांनीच एका 35 वर्षीय युवकाचा दगड व लिंबाच्या काठीने बेदम मारहाण करून खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशोक भगवान मोरे (वय 35) असे मयत युवकाचे नाव असून त्यांचा मृतदेह कुंभकर्ण टाकळी शिवारातील गोरक्षण (गायरान) जमिनीवर आढळून आला.
मंगळवारी (दि.9) मध्यरात्रीच्या सुमारास अशोक मोरे व त्यांचे दोन साथीदार कुंभकर्ण टाकळी शिवारातील पोद्दार शाळेमागील गट क्रमांक 472 मध्ये दारू पिण्यासाठी बसले होते. दारूच्या नशेत असताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. काही वेळातच हा वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या साथीदारांनी अशोक मोरे यांच्यावर लिंबाच्या काठीने तसेच दगडाने बेदम हल्ला चढविला.
या अमानुष मारहाणीत अशोक मोरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. खून झाल्यानंतर आरोपी घाबरले आणि रात्रभर मृतदेह घटनास्थळाजवळील शेतातच ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि.10) सकाळी सुमारे 8.15 वाजेच्या दरम्यान गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेह उचलून कुंभकर्ण टाकळी येथील गोरक्षण (गायरान) जमिनीवर आणून टाकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दरम्यान, परिसरातील नागरिकांना गायरान जमिनीत एका युवकाचा मृतदेह पडल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू व पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक मोहिते यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरविली.
प्राथमिक तपास आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच धर्मापुरीचे सरपंच तानाजी कदम, टाकळीचे पोलीस पाटील दत्ता राऊत आणि धर्मापुरीचे पोलीस पाटील परमेश्वर कदम यांनीही घटनास्थळी भेट दिली.
मयत अशोक मोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. या घटनेमुळे धर्मापुरी व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावात शोककळा पसरली आहे.