

बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी गावात 'चड्डी गँग'ने घातलेल्या धुमाकुळाची घटना ताजी असतानाच, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान दिले आहे. शनिवार, दि. २३ ऑगस्टच्या मध्यरात्री, टिपू सुलतान चौकातील एका देशी दारू दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी गल्ल्यातील १७ हजार रुपयांची रोकड लंपास केली. एकाच आठवड्यात दोन मोठ्या चोऱ्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
टिपू सुलतान चौकात नारायण गोवर्धन राठोड व भागीदार यांच्या मालकीचे देशी दारूचे दुकान आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास, चोरट्यांनी मोठ्या शिताफीने दुकानाचे लोखंडी शटर मधोमध वरच्या बाजूला वाकवले. त्यातून दोन चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानाच्या गल्ल्याचे कुलूप तोडून त्यात ठेवलेली दोन दिवसांची जमा रक्कम, सुमारे १७ हजार रुपये, चोरून पोबारा केला. हा संपूर्ण प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यात दोन चोरटे चोरी करताना स्पष्ट दिसत आहेत.
रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दुकानाचे कर्मचारी भास्कर राठोड हे दुकान उघडण्यासाठी आले असता, त्यांना दुकानाचे शटर वाकलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती दुकान मालक राठोड आणि बोरी पोलीस ठाण्याला दिली.
पोलिसांची तात्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गोपीनवार यांनी पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेची पाहणी करून वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर परभणीहून ठसे तज्ज्ञांच्या (फिंगरप्रिंट) पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने घटनास्थळावरून महत्त्वपूर्ण ठसे गोळा केले असून, ते पुढील तपासासाठी परभणीला नेण्यात आले आहेत. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागरिकांमधून संताप आणि सवाल
अवघ्या काही दिवसांपूर्वी, २१ ऑगस्ट रोजी, गावात 'चड्डी गँग'ने धुमाकूळ घालत सुमारे चार लाखांचा ऐवज लंपास केला होता. ती भीती ओसरण्याआधीच ही दुसरी मोठी चोरी झाल्याने संपूर्ण गावात दहशतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एकाच आठवड्यात दोन धाडसी चोऱ्या होऊनही चोरटे मोकाट असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. "या दोन्ही चोऱ्यांचा तपास लावून पोलीस आरोपींना जेरबंद करणार का? गावात रात्रीची पोलीस गस्त वाढवली जाणार का?" असे अनेक सवाल आता नागरिक विचारत आहेत. गावातील अनेक गल्ल्यांमध्ये पथदिवे नादुरुस्त असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. याच अंधाराचा फायदा चोरटे उचलत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांकडून केला जात आहे.
सध्या पोलीस पुढील तपास करत असले तरी, लागोपाठच्या चोऱ्यांमुळे बोरीकर मात्र भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. पोलीस प्रशासनाने या घटना गांभीर्याने घेऊन आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि गावात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करावे, अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे.