

मानवत: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा आणि जुन्या वादाचा राग मनात धरून टेम्पो चालक वैजनाथ पवार यांचा कुदळीने डोक्यात घाव घालून निर्घृण खून करणारा मुख्य आरोपी मारुती भगवान चव्हाण (वय ४०) अद्याप पोलिसांच्या ताब्यात सापडलेला नाही. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत पोलिसांच्या सहा पथकांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली आहे.
शनिवारी (ता. २६) दुपारी एकच्या सुमारास रिंगरोडवरील मानोली नाका येथील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. मृत वैजनाथ पवार हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह टेम्पो भाड्याने चालवून करत होते. त्यांच्या हत्येमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी मयताचा पुतण्या अभिषेक मारुती पवार (वय २४) यांच्या फिर्यादीवरून मारुती चव्हाण याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, खून केल्यानंतर आरोपी फरार झाला असून, चार दिवस उलटूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मानवतच्या स्थानिक गुन्हे विभागासह २० पोलिसांची सहा पथके आरोपीचा कसून शोध घेत आहेत. आरोपी दिसल्यास नागरिकांनी तात्काळ मानवत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी केले आहे.