Parbhani News : ‘मासोळी’च्या अवैध गाळ उपशावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी

Parbhani News : ‘मासोळी’च्या अवैध गाळ उपशावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा: गंगाखेड शहरासह तालुक्यातील १६ ते १७ गावच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा मुख्य स्त्रोत असलेल्या मासोळी मध्यम प्रकल्पाच्या गाळावर आता माफीयांचा डोळा असल्याचे उघड झाले आहे. आज (दि.२१) सकाळी ११ वाजता मासोळी धरणाच्या खोकलेवाडी शेतशिवारात मासोळीतील अवैध गाळ उपशांवरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. शासनाच्या लाखो रुपयांच्या गाळ गौणखनिज चोरीच्या प्रकरणात माफीयांना अभय कुणाचे ? असा प्रश्न आता मासोळी धरण प्रकल्पाच्या परिसरातील ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. Parbhani News

तालुक्यातील मासोळी धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस घसरत आहे. सद्यस्थितीत मासोळीत केवळ १ टक्काच जिवंत पाण्याचा साठा उपलब्ध आहे. परिणामी मासोळीने सध्या तळ गाठला आहे. नेमका याच परिस्थितीचा फायदा काही माफीयांनी उचलला आहे. मागील काही दिवसांत धरणातून अवैधरित्या गाळ उपसा करून शेतकऱ्यांना बेभावाने शेतीसाठी संबंधित गाळाची विक्री सुरू असल्याचे व यातून लाखो रुपयांची माया कमाविण्याचा गोरखधंदा काहींनी उघडल्याची माहिती आहे. आजवर लाखो रुपयांचा गाळ अवैधरित्या उपसा होऊन विकण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. Parbhani News

तालुका महसूल प्रशासनाला याची कुठलीच माहिती नाही अथवा महसुलातील काही यंत्रणा या माफीयांशी संलग्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण लाखो रुपयांचा अवैध गाळ उपसा होत असताना महसूल प्रशासनातील अथवा राजकारणातील कुणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय एवढा मोठा अवैध गाळ उपसा होऊच शकत नाही, असे मासोळी धरण परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
याच अवैध धंद्यातून आज सकाळी ११ वाजता मासोळी धरण परिसरात असलेल्या खोकलेवाडी शेतशिवारात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये ६ ते ८ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्याची माहिती आहे. परंतु, कायद्याचा बडगा उगीच अंगावर नको म्हणून यातील अनेक जखमींनी परभणी व नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतल्याचे कळते आहे.

तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मासोळी धरणातून अवैधरित्या लाखो रुपयांचा गाळ उपसा होत असल्याची परिसरातील ग्रामस्थांना माहिती आहे. परंतु, याबाबतीत तक्रार देण्यास कोणी पुढे येत नाही. तसेच प्रशासनातील कनिष्ठ- वरिष्ठ अधिकारी याबाबतीत लक्ष देण्यास तयार नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनीच याबाबतीत लक्ष घालण्याची मागणी आता होत आहे.

मंडळ अधिकारी, तलाठ्यांना पूर्वसूचना दिली आहे – प्रदीप शेलार, तहसीलदार

मासोळी धरण्यातून गाळ उपसा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपण यापूर्वीच संबंधित परिसरातील मंडळ अधिकारी व तलाठ्यांना याबाबतीत कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतरही अशी घटना घडली असेल, तर सखोल चौकशी करून यामध्ये महसुलातील कोणी सामील असेल, तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.

तक्रार दाखल नाहीये – दीपककुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक

संबंधित घटना घडली असेल, याबाबतीत आपणास माहिती नाही. तसेच याबाबतीत कोणी तक्रारदार ठाण्यात आलेला नाही.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news