

सेलू, पुढारी वृत्तसेवा: रेल्वेत चोरी करणाऱ्या चोरट्यांना प्रवाशांनी कपडे उतरवून बेदम चोप दिला. ही घटना संभाजीनगर येथून हैदराबादकडे जाणाऱ्या रेल्वेत (१७६५०) शुक्रवारी (दि.१६) मध्यरात्री घडली. दरम्यान, या घटनेला तीन तास उलटूनही रेल्वे पोलीस व तिकीट चेकर यांना याबाबत खबर मिळाली नव्हती. सेलू शहरातून सायंकाळी ७ वाजता रेल्वे गाडी सुटली. त्यानंतर मध्यरात्रीनंतर चोरांनी प्रवाशांचे रोख रक्कम, मोबाईल पळविले. त्यानंतर प्रवाशांनी या चोरांना पकडून रेल्वे गाडीत चोप दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, संभाजीनगर – हैदराबाद एक्सप्रेस गाडी सेलू येथून सायंकाळी ७ वाजता सुटली. मध्यरात्रीनंतर अज्ञात दोन तरूण महिला व तीन तरुण पुरुष यांनी आरक्षित डब्यामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी डब्यात झाडलोट करणे, प्रवाशांच्या शेजारी जाऊन बसणे, प्रवाशांच्या शेजारी जाऊन झोपणे, हे प्रकार सुरू केले. आणि प्रवाशांच्या बॅगमधून पैसे, मोबाईल यावर डल्ला मारून दुसऱ्या डब्यात निघून गेले. हा प्रकार काही सतर्क प्रवाशांच्या लक्षात आला. प्रवाशांनी या तरुणांचा दुसऱ्या डब्यात जाऊन शोध घेण्यास सुरुवात केली. तर यातील दोन तरुण व एक महिला प्रवाशांच्या हाती लागल्यानंतर प्रवाशांनी एकत्रित येऊन तरुणांचे कपडे उतरले. महिला प्रवाशांनी चोरी करणाऱ्या महिलेला बेदम मारहाण केली. यादरम्यान चोरी करणाऱ्या महिला व पुरुष यांनी त्यांच्या स्वतः जवळील मोबाईल गाडीच्या बाहेर फेकून दिले.
चौकशीनंतर चोरांकडे पंधरा हजार रुपये रोख आणि मोबाईल आढळून आला. हैदराबाद येथील नामपल्ली रेल्वे स्टेशन जवळ आल्यानंतर चोरांना पोलिसांच्या हवाली करण्याचे ठरले. मात्र, तीन चोरट्यांनी झटका देऊन पलायन केले. दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे पोलीस रेल्वे बोगीत न आल्याने याची नोंद कुठल्याही पोलीस स्टेशनला झाली नाही.
हेही वाचा