

परभणी, : येथील उड्डाणपुलावर शनिवारी (दि.3) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत तेथील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली व दोन्ही मयत युवकांचे पार्थीव शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नेले.
स्वप्निल सत्यप्रेम लहाने (वय ३१, रा. लक्ष्मी नगर, जुना पेडगाव रोड परभणी) तर दुसऱ्या दुचाकीवरील कृष्णा दिलीप जगताप पुंगळेकर (वय अंदाजे २५, रा. क्रांतीनगर परभणी) अशी या भीषण अपघातात मयत झालेल्या युवकांची नावे आहेत. परभणी शहर वाहतुक शाखेतील सपोनि सत्यप्रेम लहाणे यांचा मुलगा स्वप्नील लहाणे हा शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उड्डानपुलावरुन बसस्थानकाकडे जात होता.
याच सुमारास गंगाखेड रोडवरील क्रांती नगर येथील रहिवासी कृष्णा दिलीप जगताप हा त्याच्या घराकडे जात असतांना उड्डानपुलावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात येवढा गंभीर होता की, दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उड्डानपुलावर काही दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरुच असल्याचे अपघाताच्या घटनावरून पहावयास मिळत आहे. दररोज किरकोळ अपघात होत असतात मात्र याठिकाणी कायम स्वरुपी वाहतुक पोलीस कर्मचाऱ्यांची मागणी होत असतांनाही याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. भीषण अपघातात एक मोटारसायकल क्रमांक एम.एच. 22, ए.यु. 8960 तर दुसरी मोटारसायकल ही विना नंबरची असल्याची माहिती आहे. जिल्हा रुग्णालय येथे मयत युवकांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.