

परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील बोरी ठाणे हद्दीतील निवळी ठोंबरे येथील तलावातील पाण्यात एक 19 वर्षीय युवक बुडाला. भोई समाजातील मच्छीमारांनी तब्बल चार तास शोध घेत पाण्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळी बोरीच्या पोलिसांनी पंचनामा केला. ही घटना शनिवारी (दि.19) घडली. विशाल कैलास लहिरे (वय 19) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी 7.30 च्या सुमारास तलावात भोई समाजातील मच्छीमार कैलास लहिरे (रा.गोगलगाव ता.मानवत जि.परभणी) हे नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी आपल्या मुलांसमवेत गेले होते. यातच त्यांचा मुलगा विशाल हा बोटीतून तलावातील पाण्यात पडला. याची माहिती कैलास लहिरे यांनी तलावातील अन्य मच्छीमारांना सांगताच त्यांनी बोटींच्या मदतीने शोध मोहीम हाती घेतली. पण न सापडल्याने निवळी ठोंबरे येथील माजी सरपंच रमेश ठोंबरे यांनी ही माहिती बोरी पोलिसांना दिली.
घटनास्थळी जमादार सिध्दार्थ कोकाटे, अनिल शिंदे यांनी परभणी येथील आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू पथकाला संपर्क साधला. तोपर्यंत चार तास शोध घेत भोई समाजातील मच्छीमारांनी मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळी पोलिसांनी प्राथमिक पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयात नेला. निवळीचे माजी सरपंच रमेशराव ठोंबरे व ग्रामस्थांनी याकामी सहकार्य केले. जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणातील पाण्यात तीन दिवसांपासून एक मच्छीमार बेपत्ता असून तो अद्यापही सापडलेला नाही. यातच शनिवारी निवळी तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.