जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर येथून सोलापूरकडे जाणारी बस चालकाचा ताबा सुटल्याने जिंतूर-जालना महामार्गावरील अकोली नदीपात्राच्या पुलावरून खाली कोसळली. यामध्ये चालक वाहकासह ३३ प्रवासी जखमी झालेत. आज (दि.२०) सकाळी हा अपघात झाला. (Parbhani Accident)
जिंतूर-सोलापूर (एम. एच.१४ बीटी २१७०) ही बस सकाळी ८:२० वाजता जिंतूरहून निघाली होती. बसमध्ये ४५ प्रवासी होते. बस अकोली येथील नदीपात्राजवळ आली असता, चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने बस पुलावरून नदीपात्रात कोसळली. यामध्ये ३३ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील २१ गंभीर जखमी प्रवाशांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
एसटीचा चालक रंगनाथ विक्रम शेळके (वय ४५) अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाले. वाहक नितेश नागोराव देशमुख (वय ३८) (रा. चारठाना ता. जिंतूर जि.परभणी) हे सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे पाठवण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एसटीचे विभाग नियंत्रक डफळे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंघ परदेशी, पोलीस उपअधीक्षक ओव्हळ, पीआय बुद्धीराज सुकाळे, एपीआय सारला गाडेकर, जिंतूर आगाराचे चिभडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एम.एस.आर.डिसी.) अधिपत्याखाली असलेला राज्यरस्ता क्रमांक-२२२ औरंगाबाद-निर्मल या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. या मार्गावरील अनेक अरुंद पूल खिळखिळे झालेले असून यामुळे कित्येक अरुंद आहेत. हा अपघात झालेला अकोली जवळील पूल व चारठाणा जवळील अरुंद धोकादायक पुलावर असंख्य अपघात झाले आहेत. तरीहु रस्त्याचे व पुलाच्या रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. अकोली जवळील याच पुलावर वळणावर संबंधित विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने पुला समोर कोणततेही संरक्षित कठडे किंवा भिंत उभारलेली नाही. विशेष बाब म्हणजे या धोकादायक पुलाच्या दोन्ही बाजूस आवश्यक गतिरोधक नाहीत. यामुळे वेळोवेळी अपघात होतात.
हेही वाचा