

MP Chavan's demand to install C-band Doppler weather radar in Parbhani accepted!
नांदेड, पुढारी वृत्तसेवा
वातावरणातील बदल, त्यामुळे होणारी अतिवृष्टी तसेच इतर नैसर्गिक आपत्ती यांची अचूक पूर्वसूचना मिळावी आणि त्यापासून होणारे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळता यावे याकरिता परभणी येथे 'सी-बँड डॉप्लर वेदर रडार' बसवण्याची खा. रवींद्र चव्हाण यांनी केलेली मागणी केंद्रीय विज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मान्य केली आहे.
मराठवाडा विभागात सी-बँड डॉप्लर वेदर रडार (डीडब्ल्यूआर) बसवण्याची तातडीची गरज अधोरेखित करण्यासाठी आणि वादळ, गारपीट, मुसळधार पाऊस आणि पूर यासारख्या अति हवामान घटनांना या विभागाची असुरक्षितता लक्षात घेता, अचूक हवामान अंदाज आणि शेतकरी समुदायाला वेळेवर इशारे देण्यासाठी सी-बँड डॉप्लर वेदर रडार सुविधेची स्थापना अत्यंत आवश्यक असल्याचे खा. चव्हाण यांनी केंद्रीय मंत्र्यांना भेटून सांगितले होते.
कृषीप्रधान विभाग असलेल्या मराठवाड्यात मान्सूनच्या पावसात वारंवार विसंगती दिसून आली आहे. त्यामुळे शेतीवर मोठा परिणाम होतो. सुमारे २५० कि.मी.च्या उच्च कव्हरेज त्रिजांसह सी-बँड डीडब्ल्यूआर बसवल्याने तीव्र हवामान घटनांचे निरीक्षण लक्षणीयरित्या वाढेल. शेती आणि उपजीविकेवर होणारे प्रतिकूल परिणाम कमी होण्यास मदत होईल.
भारतीय हवामान विभागाने औरंगाबाद येथील म्हैसमाळ टेकड्यांवर - बँड बसवण्याचा प्रस्ताव दिला आहे, ज्यासाठी वन विभागाकडून भूसंपादनासाठी आवश्यक मंजुरी मागितली जात आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड किंवा परभणीमध्ये पर्यायी स्थळांचा विचार करण्याचा प्रस्ताव खा. चव्हाण यांनी दिला होता.
खासदार रवींद्र चव्हाण यांच्या सोबतच परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सुद्धा परभणी येथे सी-बँड डॉप्लर वेदर रडार बसवण्यासाठी पाठपुरावा केला होता. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे हवामान तज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी या विषयात तांत्रिक मार्गदर्शन व सहकार्य केले आहे.