

किनवट, पुढारी वृत्तसेवा : किनवट- माहूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळावा, व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबावी, यासाठी किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीस हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आ. केराम यांनी निवेदनात म्हटले आहे की, किनवट व माहर तालुक्यातील शेतकऱ्यांनी निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीतही कष्टाने सोयाबीन पीक तयार केले आहे. मात्र शासनमान्य खरेदी केंद्र सुरू न झाल्याने व्यापाऱ्यांकडून शेतमालाला कवडीमोल दर मिळत असून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा, तसेच व्यापाऱ्यांकडून होणारे शोषण रोखण्यासाठी ही उलाढाल अट शिथिल करून किनवट बाजार समितीस खरेदी केंद्र सुरू करण्याची तातडीने परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
किनवट बाजार समिती ही 'क' वर्गातील असून, खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी तीन वर्षांत तीन कोटी रुपयांच्या उलाढालीची अट असल्याने समितीस परवानगी मिळत नाही. तथापि, समितीने २०१७पासून खरेदी केंद्र यशस्वीरित्या चालवले असून २०२४-२५ या वर्षात ३२ हजार ४२६ क्विंटल इतका सोयाबीन शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला आहे.