

गंगाखेड: पावसाने उघड दिली असली तरी पैठणच्या नाथसागर धरणातून आणि माजलगाव धरणातून सतत होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीने अवघ्या पाच दिवसांत पुन्हा रौद्रावतार धारण केला आहे. परिणामी तालुक्यातील १६ गावांचा संपर्क तुटला असून बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
२३ व २४ सप्टेंबरपासून नाशिक परिसरातील पावसामुळे नाथसागर व माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या मैराळ, सावंगी, खळी, महातपुरी, दुसलगाव, भांबरवाडी, मुळी, सायाळा, सुनेगाव, धारखेड, झोला,पिंपरी, मसला, नागठाणा तसेच गंगाखेड शहरातील ओढे-नाले तुडुंब भरून वहात आहेत.
यामुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यांसारखी खरीपातील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांचे हातचे पिके तर गेलेच, पण पुढील रब्बी हंगामासाठी शेत मशागत करणेही कठीण होणार असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.फक्त शेतीच नव्हे तर शहरी भागातही मोठे नुकसान झाले आहे. गंगाखेड शहरातील तारू मोहल्ला व बरकत नगर येथे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. काही कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे.सायळा-सुनेगाव येथील इंद्रायणी नदीच्या बॅकवॉटरमुळे संपर्क तुटला आहे. धारखेड पुलावरून पाणी वाहत असल्याने पुला पलीकडील गावांचा संपर्क तुटल्याचे चित्र आहे.
उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत पाण्याचा प्रवाह वाढत राहणार असून त्यानंतर स्थिर होईल. रात्रीपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.