

Parbhani Muslim Community Ijtema
मानवत : मानवता धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म असून जगातील विविध धर्म, पंथ व संप्रदाय मानवाला सदाचार, संयम, त्याग आणि परोपकाराचे धडे देतात. मात्र या सर्वांच्या पलीकडे जाऊन जो धर्म माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतो, तो म्हणजे मानवता धर्म असल्याचे स्पष्ट व ठाम मत परभणी जिल्ह्याचे प्रमुख मुफ्ती इब्राहिम साहब यांनी मानवत येथे आयोजित दोन दिवसीय तबलीगी इस्तेमात दुवा (प्रार्थना) अगोदर आपल्या प्रवचनातून व्यक्त केले.
शहरातील उक्कलगाव रोडवरील ईदगाह मैदानावर मानवत व सेलू तालुक्यातील मुस्लिम नागरिकांसाठी इस्तेमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मुफ्ती इब्राहिम साहब पुढे म्हणाले की, आज समाजात वाढत चाललेली द्वेषभावना, असहिष्णुता आणि स्वार्थ यामुळे माणूस माणसापासून दूर जात आहे. अशा परिस्थितीत मानवतेचा धर्म अंगीकारणे ही काळाची गरज आहे. धर्म म्हणजे केवळ उपासना नसून चांगले आचरण, शेजाऱ्याची काळजी घेणे, गरजूंच्या मदतीला धावून जाणे आणि समाजात शांतता प्रस्थापित करणे होय, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मुफ्ती निजाम साहब व मुफ्ती गौस सहाब कास्मी, मुफ्ती अब्दुल कदिर सहाब, मुफ्ती फजल सहाब यांनीही मानवतेवर सखोल मार्गदर्शन केले. जात, धर्म, भाषा, प्रदेश किंवा आर्थिक स्थितीचा कोणताही भेद न करता प्रत्येक व्यक्तीकडे माणूस म्हणून पाहणे, त्याच्या दुःखात सहभागी होणे आणि आनंदात सामील होणे, हीच मानवतेची खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले. आजचा समाज स्पर्धात्मक, तणावग्रस्त व स्वार्थप्रधान होत चालला असून मानवतेची मूल्ये दिवसेंदिवस कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
समाजात सलोखा, शांतता आणि सहअस्तित्व टिकवण्यासाठी मानवता धर्माचा स्वीकार करणे हीच खरी धर्मनिष्ठा आहे, अशी शिकवण मोहम्मद पैगंबर यांनी दिल्याचेही धर्मगुरूंनी सांगितले. आपला शेजारी कुठल्याही धर्माचा, जातीचा किंवा विचारांचा असो, त्याला आपल्यापासून कोणताही त्रास होऊ नये, त्याची काळजी घ्यावी, तसेच मुला-मुलींची लग्ने साध्या पद्धतीने करून समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असे मौलिक मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
मानवत शहरात झालेल्या या दोन दिवसीय तबलीगी इस्तेमामुळे शहरासह संपूर्ण परिसरात आध्यात्मिक, धार्मिक व सकारात्मक वातावरण निर्माण झाले. समाजात शांतता, परस्पर आदरभाव आणि सहअस्तित्व अधिक दृढ झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले.
दिनांक ६ जानेवारी रोजी मगरीब नमाजीनंतर मुफ्ती इब्राहिम साहब यांनी हजारो भाविकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सामूहिक दुवा पठण करण्यात आले. कार्यक्रमात शिस्तबद्धपणा, स्वच्छता व स्वयंशिस्तीचे उत्कृष्ट दर्शन घडले. हजारो स्वयंसेवकांनी सेवाभावाने सहभाग नोंदवून आयोजन यशस्वी केले.
इस्तेमाच्या काळात अनेक मुस्लिम बांधवांकडून बिस्किटे, फळे व पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर व पत्रकारांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन आयोजनाचे कौतुक केले. मानवत नगरपरिषद, पोलीस प्रशासन, विद्युत महावितरण विभाग यांनी आवश्यक ते सहकार्य केले.
हिवाळ्याच्या दिवसांमुळे मानवत येथील प्लंबर बांधवांनी भाविकांसाठी गरम पाण्याची विशेष सोय उपलब्ध करून दिली. या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वतंत्र दवाखान्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.