

Parbhani News: A mountain of challenges awaits the new rulers
परभणी, पुढारी वृत्तसेवा : शहर मनपाच्या निवडणुकीमध्ये प्रमुख राजकीय पक्षांमध्ये तीव्र चुरस निर्माण झाली आहे. मनपाच्या नूतन सत्ताधाऱ्यांसमोर विविध आव्हानांचा डोंगर उभा असणार आहे.
नगर पालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्यानंतर परभणीकरांना चांगल्या सुविधा मिळतील असे नागरिकांना अपेक्षित होते, मात्र तसे काही घडले नाही. नागरिकांना उच्च दर्जाच्या सुविधा मिळणे तर दूरच, मूलभूत सुविधांसाठी ही झगडावे लागत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था व अनेक प्रभागात दिवाबत्तीची सोय नसल्याचेही वास्तव आहे.
शहरांमध्ये दोन जलश ध्दीकरण केंद्र व १६ जलकुंभ असताना देखील परभणीकरांना पाण्यासाठी आठ -आठ दिवस वाट पहावी लागते. विसर्जित महापालिकेवर प्रशासकाचा ताबा असल्यामुळे तत्कालीन प्रशासक व आयुक्त यांनी आपल्या नातेवाईकांच्या विविध एजन्सींना सेवा देण्यासाठी नेमले, परंतु संबंधित अधिकारी यांचे नातेवाईक असलेल्या एजन्सी धारकांकडून अपेक्षित काम झाले नसल्याचे वास्तव आहे.
अनेक एजन्सीचे कोट्यवधी रुपयाचे देयके थकल्याने काही एजन्सीनी काम बंद केले आहेत. यामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करणारी एजन्सी, मोकाट जनावरे पकडणारी एजन्सी, पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करणारी एजन्सी यांनी चक्क काम बंद केले आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून काही ठिकाणी नाल्या सफाई व कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसतानाही महापालिकेने आपल्या करामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात केलेली वाढ नागरिकांच्या खिशाला कात्री लावत आहे. मनपाला विविध स्रोताच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याची संधी असताना, मनपाने ती गमावली आहे. शहरभर होर्डिंगची बजबजपुरी माजली असून महापालिकेच्या जागेवर बिनदिक्कतपणे जाहिरात एजन्सी होर्डिंग लावत आहेत, पण या एजन्सींकडून कराची वसुली न होता काही अधिकारी आपले हात ओले करून घेताना दिसून येत आहेत.
नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेली शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पगारी करू शकत नाही, यामुळे मनपातील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगारी वेळेवर होत नसल्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचारी हे वारंवार काम बंदीचे अस्त्र उगारत आहेत. एकंदरीत शहरवासीयांना स्वच्छ रस्ते, पिण्यासाठी मुबलक पाणी, धूळ मुक्त शहर, दिवाबत्तीची सोय या मूलभूत गोष्टींची अपेक्षा असताना मनपा प्रशासन त्या गोष्टीची पूर्तता ही करू शकत नसल्याचे वास्तव आहे.
यामुळे शहरवासीयांचा पुरता अपेक्षाभंग झाला असल्याचे सत्य आहे. शहराची अवस्था आजघडीला बकाल झाली आहे. शहराची अवस्था बकाल झालेली असताना मनपामध्ये प्रवेश करत कारभारी बनण्यासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. ६५ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये तब्बल ४११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वच राजकीय पक्षांचा मनपामध्ये सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकी दरम्यान निष्क्रिय कारकीर्द ठरलेल्या काही माजी नगरसेवकांना नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
कर वसुलीत महापालिका मागे
महापालिकेचा १६१ कोटींचा कर थकीत असून मनपाला कोट्यवधी रुपयांचे देणे द्यायचे आहेत. असे असताना मनपा प्रशासन मात्र कर वसुली मागे असल्याचे दिसून येत आहेत. कर वसुलीचे प्रमाण नगण्य असल्याने याचा थेट विकास कामांवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.