

गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील डोंगर पिंपळा येथे एका २३ वर्षीय तरुणाने शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ५ जानेवारी) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सुनील शिवाजी कतारे असे मृत तरुणाचे नाव असून, ऐन उमेदीच्या काळात त्याने घेतलेल्या या निर्णयामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कतारे हा सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतात गुरे चारण्यासाठी गेला होता. सकाळचे ११ वाजले तरी सुनील घरी न परतल्याने आणि शेतात काही हालचाल न दिसल्याने संशय बळावला. दरम्यान, शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने सुनीलने गळफास घेतल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
हा प्रकार समजताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली. अवघ्या २३ वर्षांच्या तरुणाने अशा प्रकारे आपली जीवनयात्रा संपवल्याने कतारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती विठ्ठल रुस्तुमराव कतारे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने डोंगर पिंपळा येथील घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. सुनीलच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस जमादार भीमराव पवार करीत आहेत.