

मानवत नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून बुधवारी (दि. २६) शहरातील सर्व 58 उमेदवारांना अधिकृतपणे निवडणूक चिन्हे वाटप करण्यात आली. नगराध्यक्षा पदासाठीचे दोन उमेदवार आणि प्रभाग 1 ते 11 मधील 22 जागांसाठी एकूण 56 उमेदवार रिंगणात आहेत. यामधील 54 उमेदवार राजकीय पक्षांकडून असून केवळ 4 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. या अपक्षांना शिट्टी, कपबशी, ऑटोरिक्षा आणि हेलिकॉप्टर अशी लक्षवेधी चिन्हे मिळाली आहेत.
नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश गायकवाड, संजय खिल्लारे, तसेच सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार ही प्रक्रिया पार पडली.
मानवत नगरपालिकेसाठी या वर्षी अपक्ष उमेदवारांची संख्या अत्यंत कमी असून केवळ 4 उमेदवारच पक्षीय राजकारणापासून दूर राहून स्वतंत्र लढत देत आहेत.
तर दुसरीकडे राजकीय पक्षांचा जोरदार दबदबा दिसून येतो.
राष्ट्रवादी काँग्रेस – २१ उमेदवार, चिन्ह: घड्याळ
शिवसेना (शिंदे गट) – १४ उमेदवार, चिन्ह: धनुष्यबाण
भाजप – १० उमेदवार, चिन्ह: कमळ
यापैकी ८ जागींवर युती
प्रभाग २ ‘ब’ मधील ज्ञानोबा कच्छवे व प्रभाग ६ ‘ब’ मधील संदीप हंचाटे हेही कमळ चिन्हावर मैत्रीपूर्ण लढत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) – ४ उमेदवार, चिन्ह: मशाल
काँग्रेस – ३ उमेदवार, चिन्ह: पंजा
या निवडणुकीत लक्षवेधी ठरलेली आहेत अपक्षांना मिळालेली अनोखी चिन्हे—
भारत कच्छवे (प्र. ६ ब) – शिट्टी
प्रा. गोविंद गहिलोत – कपबशी
बालाजी दहे – ऑटोरिक्षा
लक्ष्मीकांत सोळंके (प्र. ११ ब) – हेलिकॉप्टर
या चिन्हांमुळे स्थानिक निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढली आहे.
मानवत शहरातील एकूण 11 प्रभागांमध्ये 22 जागांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. पक्षनिहाय आखणी, स्थानिक प्रश्न, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि अपक्षांच्या नाविन्यपूर्ण चिन्हांमुळे प्रत्येक प्रभागात निवडणूक रंगात आली आहे. नगराध्यक्ष पदाच्या दोन्ही उमेदवारांमध्येही तितकाच संघर्ष असून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.
सध्या शहरभर प्रचार मोहीम सुरू असून घर-घर संपर्क, रस्त्यावरील सभा, सोशल मीडिया प्रचार आणि मतदारांशी संवाद अशा विविध पद्धतीने सर्व उमेदवार मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. नागरिकांमध्येही निवडणुकीबद्दल उत्सुकता असून कोण पक्ष, कोण उमेदवार आणि कोणता प्रभाग कुणाच्या बाजूने झुकतोय, याबाबत गावोगाव चर्चा रंगल्या आहेत.
आता 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार असून कोणत्या उमेदवाराच्या नशिबात विजय येणार, कोणत्या पक्षाचे खाते उघडणार आणि अपक्ष उमेदवार किती प्रभाव पाडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.