

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील सवासनी गावात सोमवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आणि संपूर्ण गावाला दुःखाच्या छायेत जावं लागलं. पती–पत्नीमधील किरकोळ वाद इतका वाढला की दोघांचेही जीव घेतला. शेतातील विहिरीत उडी मारून पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, आणि तिला वाचवण्यासाठी पतीने धावत जाऊन विहिरीत उडी घेतली. पण या धडपडीत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने गाव हादरून गेला असून सवासनी गावात शोककळा पसरली आहे.
सवासनीचे रहिवासी अमोल जगताप (वय 45) आणि त्यांची पत्नी सीमा जगताप (वय 35) यांच्यात सोमवारी संध्याकाळी किरकोळ घरगुती वाद झाला. घरातील भांडण शांत झालं नाही आणि रागाच्या भरात सीमाने घरातून बाहेर पडत जवळच्या शेतातील विहिरीकडे धाव घेतली. काही क्षणांतच तिने विहिरीत उडी मारली. तिचा पती अमोल हे तिच्या मागोमाग पोहोचले आणि पत्नीला वाचवण्यासाठी त्यांनीही विहिरीत उडी घेतली.
पण विहिरीचं पाणी खोल असल्याने आणि अंधार पडल्यानं, अमोल यांना पत्नीला बाहेर काढणं शक्य झालं नाही. उलट, दोघेही पाण्यात अडकले आणि काही वेळात त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.
रात्री उशिरापर्यंत घरच्यांनी आणि गावकऱ्यांनी दोघांचा शोध घेतला. घरातून निघून गेले तरी रात्रभर परत न आल्याने गावकऱ्यांना संशय आला. शोधमोहीम सुरू असतानाच विहिरीबाहेर सीमाची चप्पल आढळून आल्याने सर्वांचे लक्ष त्या ठिकाणी गेले. गावकऱ्यांनी विहिरीत टॉर्च टाकून पाहण्याचा प्रयत्न केला, पण अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले.
मंगळवारी पहाटे पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने विहिरीत उतरत शोधमोहीम सुरू केली आणि काही वेळातच दोन्ही मृतदेह वर काढण्यात आले. मृतदेह बाहेर आल्यावर सर्वत्र हळहळ व्यक्त झाली.
या दुर्दैवी घटनेत जगताप दांपत्याची १५ वर्षांची मुलगा आणि १२ वर्षांची मुलगी अशा दोघांची पोरकी झाली आहेत. अमोल आणि सीमा यांच्या अचानक मृत्यूने या दोन निरागस मुलांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. गावातील अनेकांनी त्यांच्या भविष्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. सवासनी गाव शोकमग्न असून गावकऱ्यांमध्ये या घटनेबद्दल अतोनात दुःख आहे. मंगरुळपीर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.