

डॉ. सचिन चिद्रवार
मानवत: मानवत नगर परिषदेच्या निर्मितीनंतर 71 वर्षाच्या कार्यकाळात आतापर्यंत शहरातील तब्बल 40 जणांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे. यामध्ये 7 महिलांचा समावेश आहे. परंतु या 40 नगराध्यक्ष पैकी 51 वर्षांपूर्वी नगराध्यक्ष पद भूषविलेले दिवंगत मदनलाल मंत्री यांच्या कार्यकाळात झालेल्या कामाची चर्चा अद्याप नागरिकांत केली जाते.
1954 मध्ये स्थापन झालेल्या मानवत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा पहिला मान गणपतराव गाजरे यांना मिळाला होता. एक एप्रिल 1954 ते 29 ऑगस्ट 1958 पर्यंत त्यांनी नगराध्यक्षपद भूषविले. त्यानंतर उत्तमराव बारहाते, श्रीराम माळवदे, मारोतराव करपे, रामलाल राठोड, नागोराव बारहाते, उद्धवराव पाटील, शंकरलाल मंत्री, त्रिंबकराव कोराटे, मधुकरराव कत्रूवार, मुरलीधर बंडे, मदनलाल मंत्री, श्यामसुंदर बांगड, बालकिशन चांडक, दिनेश देशमुख, बालाजी लाड, अॅड. दिगंबर बारटक्के, अॅड. सुरेश बारहाते, संजयकुमार बांगड, अमृतराव भदर्गे, अब्दुल रहीम अब्दुल करीम, विजयकुमार कत्रूवार, शकुंतलाबाई कुमावत, अब्दुल रहीम अब्दुल करीम, जुगलकिशोर राठी, महेश कोक्कर, सरस्वतीबाई रोडे, शायदा महम्मद अकबर, रबिया बी अन्सारी, गणेश कुमावत, मोहन लाड, सुशिलाबाई लाड, शिवकन्या स्वामी, राणी लाड, व प्रा सखाहरी पाटील यांचा समावेश आहे.
यातील मुरलीधर बंडे, मारोतराव करपे, श्रीराम माळवदे, बालकिशन चांडक व अब्दुल रहीम बागवान या पाच जणांना दोन वेळेस नगराध्यक्ष भूषविण्याचा मान मिळाला. तर दिनेश देशमुख यांना 12 ऑक्टोंबर 1992 ते 27 डिसेंबर 1992 या अडीच महिन्यांच्या अल्पावधीत नागराध्यक्ष पद मिळाले होते. 1996 मध्ये काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांच्या नेतृत्वात निवडून आलेल्या तब्बल 9 नगरसेवकांना झालेल्या वाटाघाटीमध्ये पाच वर्षाच्या कालावधीत सहा सहा महिन्यांसाठी नगराध्यक्षपद मिळाले होते.
दिवंगत मदनलाल मंत्री यांच्या कामाची अद्याप चर्चा
तब्बल 51 वर्षांपूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले मदनलाल मंत्री यांनी 17 डिसेंबर 1974 ते 22 जानेवारी 1981 या त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या दर्जेदार कामाची चर्चा अद्यापही शहरात केली जाते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शासनाकडून निधी उपलब्ध होत नसताना देखील शहरातील चुंगी नाक्यावरील यंत्रणा कडक करून निधी जमा केला होता. या निधीतून त्यांच्या काळात शहरातील गल्लोगल्लीत दर्जेदार सिमेंट रोड व नाल्याची निर्मिती करण्यात आली होती. तसेच नगरपालिकेत ठराव घेऊन शहरातील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला होता, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते नंदलाल मंत्री यांनी 'दै पुढारी'शी बोलताना दिली. त्यांनी शहरात केलेल्या दर्जेदार विकास कामाची 51 वर्षानंतरही आजही नागरिक आठवण करीत आहेत.