

Licenses of 9 Fertilizer Sales Centers Suspended in Parbhani District
परभणी, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व किटकनाशकांचा अखंड व पारदर्शक पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा कृषी विभागाने राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली. नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने जिल्ह्यातील तब्बल 9 खत विक्री केंद्रांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले असून, 2 परवानाधारकांना कडक शब्दांत समज देण्यात आली आहे.
परभणी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या दालनात झालेल्या सुनावणीत संबंधित केंद्रचालकांकडून सादर करण्यात आलेली बाजू व खुलासे असमाधानकारक ठरले. तपासणी दरम्यान उघड झालेल्या अनियमिततांनी प्रशासनालाही धक्का बसला असून, संपूर्ण यंत्रणेतील शिस्तबद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तपासणी दरम्यान अनेक केंद्रांमध्ये ई-पॉस प्रणालीतील व्यवहारांमध्ये स्पष्ट तफावत आढळून आली. कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या अॅकनॉलेजमेंट वेळेत स्वीकारले न गेल्याचेही समोर आले.
याशिवाय, नोंदवलेला साठा आणि प्रत्यक्ष उपलब्ध साठा यामध्ये मोठी विसंगती दिसून आली. काही ठिकाणी आकडेवारीत गंभीर फरक आढळल्याने संभाव्य गैरव्यवहाराची शक्यता अधिक गडद झाली आहे. विक्री केंद्रांवर आवश्यक असलेले भावफलक व साठाफलक अद्ययावत नसणे, ही आणखी एक गंभीर बाब उघडकीस आली. तसेच शेतकऱ्यांना खरेदीनंतर पक्की बिले न देणे, बिलांवर स्वाक्षरी न घेणे यांसारख्या नियमभंगाच्या घटना सातत्याने आढळल्या.
या सर्व प्रकारांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी या कारवाईतून सर्व खत व बियाणे विक्रेत्यांना स्पष्ट संदेश दिला की, शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणाऱ्या कोणालाही माफी नाही. भविष्यात अशा प्रकारच्या अनियमितता आढळल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्हा कृषी विभागाने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शेतकऱ्यांच्या हितासाठी शून्य सहनशीलता धोरण कायम ठेवले जाईल आणि नियमभंग करणाऱ्यांवर पुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार आहे.