Parbhani|पावसाची आस लागली, खरीप धोक्यात! पिके माना टाकू लागल्याने शेतकरी चिंतेत

Kharif crops await rain-पावसाची आस लागली, खरीप धोक्यात! पिके माना टाकू लागल्याने शेतकरी चिंतेत
Farmer
FarmerPudhari
Published on
Updated on

परभणी : परभणी जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा परिणाम जाणवत आहे. पेरणीनंतर सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पिके उभी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. जिल्ह्यातील शिवार पावसाच्या प्रतीक्षेत असून बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांसह खरीप पिकांना पावसाची नितांत गरज असताना आभाळ कोरडेच आहे. जमिनीतील ओलावा कमी होत असून, पिके माना टाकू लागली आहेत. पेरणीनंतर समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पिकांची उगवण आणि वाढ चांगली होईल, अशी अपेक्षा केली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने या अपेक्षांवर पाणी फिरण्याची चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी पिके माना टाकू लागली असून, आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीवर खर्च केला आहे. त्यामुळे पिके हातातून गेल्यास या खर्चाची परतफेड कशी करायची, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. उत्पादन घटल्यास कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यताही आहे. पावसाचा खंड केवळ पिकांपुरता मर्यादित राहत नाही. दुष्काळाची झळ केवळ जमिनीला बसत नाही, ती शेतकऱ्याच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीलाही होरपळून काढते. चारा, जनावरे, पिण्याचे पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस आणखी लांबल्यास परिस्थितीचे गांभीर्य वाढू शकते.

स्टेटसपेक्षा संवेदनांची गरज

समाजमाध्यमांवर सध्या ऐंशीच्या जुन्या ग्रामीण जीवनाची छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत. त्या आठवणी जपणे निश्चितच महत्त्वाचे आहे. मात्र, त्याच वेळी आजच्या शिवारातील वास्तवाकडेही लक्ष जाणे गरजेचे आहे. जुन्या छायाचित्रांत हिरवेगार शिवार, बैलगाड्या आणि शेतकरी जीवन दिसत असताना, आजचा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. जुन्या आठवणींवर प्रतिक्रिया देणाऱ्या समाजमाध्यमांवरील गर्दीत आजच्या शेतकऱ्याच्या संकटाचीही चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कारण खरी ग्रामीण समृद्धी ही आजच्या शिवारात उभ्या असलेल्या शेतकऱ्याच्या पिकात आहे.

Farmer
Parbhani News : कोरड्या दुष्काळासाठी पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांचे आंदोलन

जुन्या आठवणींचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होणे ही चांगली बाब आहे. मात्र, त्याच समाजमाध्यमांवर आजच्या शेतकऱ्याच्या कोरड्या शिवाराची, करपणाऱ्या पिकांची आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाचीही चर्चा व्हायला हवी. भूतकाळ जपताना वर्तमानाकडे दुर्लक्ष होऊ नये, एवढीच अपेक्षा.

Farmer
Accident News : भरधाव कारची दोन दुचाकींना धडक; अपघातात तिघे जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news