Parbhani News : कोरड्या दुष्काळासाठी पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांचे आंदोलन

तरोडा येथे पोळ्याला फाटा देत बळीराजा संतप्त ; पंचनामे, पीकविमा भरपाईची मागणी
Parbhani News
Parbhani News : कोरड्या दुष्काळासाठी पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांचे आंदोलनfile photo
Published on
Updated on

Farmers protest by climbing on water tanks to protest against dry drought

परभणी, पुढारी वृत्तसेवा : पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने खरीप पिके संकटात सापडली असताना शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील तरोडा येथे शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असलेल्या पोळ्यालाच फाटा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी (दि.10) सकाळी आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून कोरडा दुष्काळ जाहीर करा अशा घोषणा देत शासन-प्रशासनाच्या कारभारा विरोधात संताप व्यक्त केला.

Parbhani News
Maratha reservation : पूर्णेत मराठा आरक्षणासाठी महिलाशक्ती सरसावली

यंदाच्या खरीपात पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने सोयाबीन, कापूस, तूर यासह विविध पिकांना मोठा फटका बसला. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे खरीपातील उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांत निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित पोळा सण तरोड्यात यंदा वेगळ्या पद्धतीने अधोरेखित झाला. बैलांची पूजा करून उत्सव साजरा करण्याऐवजी दुष्काळाच्या परिस्थितीने त्रस्त कोरडा दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी टाकीवर चढून आंदोलन केले.

शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. पोळ्याला फाटा देत शासनाचे लक्ष दुष्काळाकडे वेधण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील असंतोषाची तीव्रता स्पष्ट झाली. गुरुवारी सकाळी 10 ते 11.30 वेळेत आंदोलन केले. यावेळी काही आंदोलक पाण्याच्या टाकीवर चढले आणि तेथून घोषणाबाजी केली.

कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या अशा घोषणांनी परिसर दणाणला. पावसाअभावी नुकसानीतील पिकांचे तातडीने पंचनामे करा, शेतकऱ्यांना भरपाई द्या, पीकविमा कंपन्यांकडून भरपाई मिळवून द्या, अशी मागणी केली. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत शेतकरी तसेच पशुधनासाठी चारा व पाण्याची व्यवस्था करा, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्या, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

Parbhani News
Accident News : भरधाव कारची दोन दुचाकींना धडक; अपघातात तिघे जखमी

दरम्यान, मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणालाही तरोडा ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. शेतकरी प्रश्नांसह सामाजिक प्रश्नांवरही शासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी भावना व्यक्त केली. आंदोलनात किशोर ढगे, गजानन तुरे, विकास भोपळे, गजानन दुगाणे, जाफर तरोडेकर, सुदाम शेळके, नारायण सोळंके, मुरलीधर शेळके, गफार शेख, नारायण शेळके, सुरेश शेळके, सिद्धेश्वर शेळके, ग्रामस्थ सहभागी होते.

पिके वाचविण्याची धडपड

पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले. महागडी बियाणे, खते, औषधे व मशागतीचा खर्च करून उभे पीक पावसाअभावी हातातून जाण्याची वेळ आली. उत्पादनाची शाश्वती नसताना कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला. या परिस्थितीची तातडीने दखल घेत शासनाने संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती व मदतीचा लाभ द्यावा, अशी मागणीही यावेळी केली.

आश्वासन नको, ठोस मदत हवी

दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना केवळ पाहणी, बैठका आणि आश्वासनांवर शासनाने समाधान मानू नये. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. पिकांचे नुकसान वाढण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी यावेळी मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news