

Inspiring... Posthumous eye donation from five-year-old Sneha
परभणी, पुढारी वृत्तसेवा अवघे पाच वर्ष वय असलेल्या स्नेहा मनोज लाड (रा. केकरजवळा ता. मानवत) हिचे देवगीरी हॉस्पिटल येथे गुरुवारी (दि. २७) सकाळी ८.३० वाजता निधन झाले. या दुःखद प्रसंगात तिच्या कुटुंबीयांनी मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तत्काळ जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधल्यानंतर तिचे नेत्र व बुबूळ जालना येथील नेत्र पेढीत पाठविण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र शल्य चिकित्सक डॉ. पुजा चव्हाण व मयुर जोशी यांनी देवगीरी हॉस्पिटलमध्ये नेत्रदानाचे कार्य तत्काळ पार पाडले.
या प्रक्रियेत जिल्हा रूग्णालयातील नेत्र विभागातील डॉ. अर्चना गोरे आणि देवगिरी हॉस्पीटलचे डॉ. एकनाथ गबाळे यांनी सहकार्य केले. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जमा केलेली नेत्रे व बुवूळे ही जालना येथील नेत्र पेढीस पाठविण्यात आली आहेत. या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना पुन्हा दृष्टी प्राप्त होण्याचा अमूल्य उपहार दिला गेला आहे. जिल्ह्यातील हे या वर्षातील पाचवे नेत्रदान ठरले आहे.
नेत्रदान ही मानवतेची एक महान सेवा
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी नागरिकांना मृत्यूनंतर नेत्रदानाचा संकल्प घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, नेत्रदान ही मानवतेची एक महान सेवा आहे. प्रत्येक कुटुंबाने आपल्या प्रियजनांचा मृत्यूनंतरदेखील जीवन व प्रकाश द्यायचा विचार करावा. एक मृत व्यक्तीच्या नेत्रांमुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. पाच वर्षीय स्नेहा लाड यांचे कुटुंबीयही या पवित्र कार्याबद्दल अत्यंत समाधानी असून, त्यांनी या निर्णयामुळे इतरांना प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.