

Government Soybean Purchase Center
आनंद ढोणे
पूर्णा: पूर्णा तालुका खरेदी विक्री संघाच्या अंतर्गत नुकतीच ऑनलाइन नोंदणीकृत शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली होती. मात्र, पांगरा रोडवरील समर्थ कृषी बाजार मार्केटमधील शासकीय आधारभूत किंमतीवर सुरू असलेले खरेदी केंद्र काही दिवस सुरू झाल्यावर बंद पडले.
जिल्हा पणन मंडळाकडून खरेदी केलेल्या सोयाबीनच्या बारदान पोत्याला आवश्यक नोंदणी लेबल उपलब्ध न झाल्यामुळे केंद्र चार दिवसांपासून बंद आहे. परिणामी, ऑनलाइन नोंदणीकृत शेतकरी हवालदील झाले आहेत.
पूर्णा तालुका खरेदी विक्री संघाला शासनाने एनसीसीएफच्या माध्यमातून आधारभूत किंमत योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाकडून यंदाही सोयाबीन खरेदी केंद्रास मान्यता दिली आहे. आतापर्यंत तालुक्यातील सुमारे १४०० शेतकऱ्यांनी ५३२८ रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली असून नोंदणी अजूनही सुरू आहे.
सुरुवातीला खरेदी केंद्रावर काही शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन आणले, मात्र खरेदी करताना फक्त स्वच्छ, क्लियर आणि योग्य मोजणी केलेले सोयाबीनच घेतले जाते. अन्यथा, महासंघाकडून अस्वच्छ सोयाबीन परत पाठविली जाते आणि खरेदी केंद्राला दंड लागतो. काही शेतकऱ्यांनी सुरुवातीला सर्व सोयाबीन तोलून घेण्याचा रेटा लावला होता, मात्र नियम समजल्यावर फक्त योग्य सोयाबीन खरेदी केले जात आहे.
बारदान लेबल उपलब्ध नसल्यामुळे खरेदी केंद्र नाईलाजाने बंद करावे लागले आहे. खरेदी संघाचे कर्मचारी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दररोज चक्कर मारत आहेत, परंतु महासंघाच्या हलगर्जीपणामुळे लेबल अद्याप मिळालेला नाही. बारदान लेबल उपलब्ध होताच खरेदी केंद्र पुन्हा सुरू केले जाईल, असे खरेदी संघाचे अध्यक्ष बापूराव घाटोळ यांनी सांगितले.
सातबारा उतारावर सोयाबीन पेरलेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांकरिता प्रति हेक्टरी २ हेक्टरपर्यंत १३ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्याचा नियम आहे.
यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिके नष्ट झाली. पाणी न धरणाऱ्या उंचवटा शेतांमध्ये तग धरलेली पिकेही पाणी साचल्यामुळे खराब झाली. परिणामी, उत्पादन सुमारे ५०% कमी झाले असून प्रति एकरी फक्त २-३ क्विंटल पिके मिळाली.
शेतकऱ्यांनी कर्जाच्या ताणाखाली आपले उत्पादन वाचवून चांगला दर मिळावा म्हणून शासकीय हमीदर केंद्रावर नोंदणी केली, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव खरेदी केंद्र बंद पडल्याने शेतकरी बाजारात अडकले आहेत.