

जिंतूर : 'भावपूर्ण श्रद्धांजली'चा स्टेटस ठेवून पतीने पत्नीवर तब्बल १२ वार करून तिचा धारदार शस्राने खून केला. ही घटना गुरूवारी (दि.२८) जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथील शेतशिवारात घडली. विद्या विजय राठोड असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती विजय राठोड याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथील विद्या हिचा वाघी येथील रहिवाशी विजय राठोड याच्याशी ८-१० वर्षापूर्वी विवाह झाला असून त्यांना दोन अपत्य आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडण झाल्याने विद्या आपल्या माहेरी आली होती. दरम्यान गुरूवारी ती सोनापूर येथील त्यांच्या शेतशिवारात थांबली असता विजय राठोड त्या ठिकाणी आला. त्यानंतर त्याने तिच्यावर धारदार शस्राने तब्बल १२ वार करून तिची निर्घृणपणे हत्या केली. विकृत पतीने पत्नीची हत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलवर पत्नीचा फोटो लावून 'भावपूर्ण श्रद्धांजली'चा स्टेटस लावल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शहराच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी करत केलेला आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता. पोलिसांकडून आरोपी विजय राठोड हा घटनेनंतर फरारी असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.