

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरूणाने २५ वर्षीय तरूणीची डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार तिच्या लहान बहीण व वडिलांसमोर घडला. या घटनेत तरूणीचा जागीच मृत्यू झाला. भावना असे हत्या झालेल्या तरूणीचे नाव असून शिवांग त्यागी असे हत्या करणाऱ्या माथेफिरू तरूणाचे नाव आहे. (Uttar Pradesh Crime)
हत्येनंतर माथेफिरू तरूणाने फिल्मी स्टाईलने पोलिस ठाण्यात जात आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. ही घटना रविवारी (दि.२०) उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील कोतवाली देहात भागात घडली. अवघ्या दहा दिवसांवर तरूणीचे लग्न असल्याने लग्नसराईची लगबग असणाऱ्या घरात दु: खाचा डोंगर कोसळला आहे.
भावनाचं दहा दिवसांवर लग्न असल्याने ती आपल्या वडिलांसह लहान बहीणीबरोबर लग्नाच्या खरेदीसाठी जात होती. तिघेही एकाच दुचाकीवरून जात असताना माथेफिरू शिवांग याने त्यांना रस्त्यात अडविले. त्यानंतर भावनाच्या कानशिलावर बंदूक रोखून धरत तिच्यावर गोळी झाडली. बंदुकीच्या आवाजाने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांना येताना पाहून माथेफिरू शिवांगने तेथून पळ काढला. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भावनाला त्यांनी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर भावनाचा मृतदेह खाजगी रूग्णालयातून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. भावनाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी शिवांग यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून त्याची कसून चौकशी सुरू आहे. (Uttar Pradesh Crime)
भावना व शिवांग हे दोघेही करोंडा चौधरी या गावचे रहिवासी आहेत. दोघांनीही महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत होते. यादरम्यान त्याचं भावनावर प्रेम बसलं. तेव्हापासून तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने अनेकदा तिच्यासमोर प्रेम व्यक्त केले, मात्र भावनाने त्याला नकार दिला. १ मे रोजी तिचे लग्न होणार असल्याचे त्याला समजल्याने त्याने रागाच्या भरात रविवारी तिला रस्त्यात गाठले. व तिची हत्या केली. (Uttar Pradesh Crime)