

जालना : जालना महानगरपालिका निवडणुकीत यंदा अपक्ष उमेदवारांची संख्या वाढली आहे. 65 जागांसाठी तब्बल 154 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांत थेट पक्षीय लढतीऐवजी दुरंगी, तिरंगी व चौरंगी सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीत मतविभाजनाचा फटका नेमका कोणाला बसणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
काही प्रभागांत शिवसेना आणि भाजप हे दोन प्रमुख पक्ष आमने सामने असले तरी अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त असल्याने थेट लढतीचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवरील नाराज कार्यकर्ते, तिकीट न मिळाल्याने मैदानात उतरलेले उमेदवार आणि व्यक्तिगत वर्चस्वासाठी लढणारे नेते यामुळे अपक्षांची संख्या वाढल्याचे दिसून येते.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने 25 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले असून, काही प्रभागांत त्यांनी थेट पक्षीय उमेदवारांना आव्हान दिले आहे. याशिवाय एमआयएमने 17 जागांवर उमेदवार उभे केल्याने अल्पसंख्याक मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा थेट परिणाम प्रामुख्याने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदारांवर होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
अनेक प्रभागांत चौरंगी लढत होत असल्याने कमी मताधिक्याने निकाल लागण्याची शक्यता असून, प्रत्येक मत मोलाचे ठरणार आहे. त्यामुळे पक्षांकडून बूथ पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. एकंदरीत, अपक्ष, वंचित आणि एमआयएमच्या सक्रिय उपस्थितीमुळे जालना मनपा निवडणुकीचे चित्र गुंतागुंतीचे बनले आहे.
शेवटी मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडते आणि कोणाला फटका बसतो, याचा फैसला मतमोजणीच्या दिवशीच होणार आहे.
निष्ठावंतांना उमेदवारी नाही
भाजपचे प्रदेश निमंत्रित सदस्य तथा माजी नगराध्यक्ष सुनील आर्दड यांनी नाराजी बाबत पत्रक जारी केले आहे. आजवर पक्षासाठी केलेल्या कार्याची माहिती देतानाच आपला मुलगा यशवंत आर्दड याच्यासाठी उमेदवारी मागितली होती; परंतु त्याला डावलण्यात आले. सोबतच नगराध्यक्ष राहिलेले चंपालाल भगत, उपनगराध्यक्ष राहिलेले किरण इंगळे, 25 वर्षांपासून काम करत असणारे सुहास मुंडे, पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष शुभांगी देशपांडे, सोपान पेंढारकर, माजी नगरसेवक अनिल संचेती, राजेश शर्मा,यांच्यासारख्या 20 ते 25 वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.