

Garbage piles up in various places in Parbhani city
परभणी, पुढारी वृत्तसेवा : ड दर्जाची महानगरपालिका असलेल्या परभणी शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे दिसत असून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. परभणीच्या नशिबी कचराच अशीच अवस्था शहराची झाली असून मनपावर प्रशासक राज असल्यामुळे अधिकाऱ्यांचा मेरी मर्जी कारभार सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे.
संपूर्ण परभणी शहरभर अगदी गजबजलेल्या वस्त्यांसह मुख्य रस्त्यांवरही कचऱ्याचे ढिगारेच ढिगारे दिसत असून पावसाळ्याच्या तोंडावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे रोगराईलाही आमंत्रण मिळत आहे. शहरात अनेक ठिकाणच्या कचरा कुंड्याच गायब झाल्याचे चित्र आहे. २०२२ला परभणी शहर महानगरपालिकेची निवडणुकीची मुदत संपल्यानंतर परभणी शहर महानगरपालिकेवर अधिकाऱ्यांचा ताबा असून अधिकारी शहरातील मूलभूत प्रश्नांकडे डोळेझाक करत मेरी मर्जी कारभार करत असल्याचे स्पष्ट आहे.
शहरातील गजबजलेला भाग असलेल्या गांधी पार्क, नेहरू पार्क, जिल्हा परिषद, कालाबावर, आझाद कॉर्नर, गणपती चौक, महात्मा फुले भाजीमंडई, बसस्थानक परिसर, आर आर टॉवर, गंगाखेड नाका, उघडा महादेव मंदिर, गुजरी बाजार, क्रांती चौकासह ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे ठळकपणे दिसून येत असून मनपा प्रशासनाला याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रभागनिहाय घंटागाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु घंटागाड्या वेळेवर येतच नसल्याचे चित्र आहे. अनेक भागामध्ये आठ आठ दिवस घंटागाड्या कचरा उचलण्यासाठी येत नसल्याचे सांगण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन एजन्सीचे चालक व सफाई कामगार अनेकवेळेला वेतन न मिळाल्यामुळे संपाचे हत्यारही उपसत असतात.
शहरातील घंटागाड्या सुरू आहेत काय असे मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांना विचारले असताना आपण बाहेर असून वेग यांच्याशी बोला. घंटागाड्या सुरू असल्याचे सांगत विस्तृत प्रतिक्रियेसाठी आयुक्त जाधव उपलब्ध होऊ शकले नाहीत.