

Four people drowned in Marathwada
सोनपेठ : परभणी येथून कंदुरी कार्यक्रमासाठी शिरुरी (ता. सोनपेठ) येथे गेलेल्या दोन तरुणांचा गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी दुपारी घडली. सोफीयानन शेख जावेद (१६) आणि रऊफ खान करीम खान (२६, दोघे रा. महात्मा गांधी नगर, धाररोड, परभणी) ही मृतांची नावे आहेत.
पोहण्यासाठी उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. हे दोघे नातेवाइकांसह शिरुरी येथे कंदुरी कार्यक्रमासाठी गेले होते. दोघेही गोदावरी नदीपात्राकडे पोहण्यासाठी गेले. परंतु तेथील पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. घटनेची माहिती मिळताच महसूल आणि पोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
तहसीलदार सुनील कावरखे, पोलिस निरीक्षक अशोक गिते, तलाठी हरकळ, महसूल कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान, रविवारी स्थानिक भोई समाजातील नागरिकांच्या मदतीने सोफियान शेख याचा शोध घेऊन त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तर दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर दुसरा तरुण रऊफ खान याचा मृतदेह सोमवारी गंगोखडजवळ पात्रात सापडला.. या घटनेमुळे शिरुरी आणि परभणी परिसरात शोककळा पसरली. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना नदी, तलाव किंवा खोल पाण्याच्या ठिकाणी पोहण्यासाठी उतरू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
मायलेकींचा नदीत बुडून मृत्यू
जळकोट : तिरु नदीत बुडाल्याने मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. कौसल्या अजय वाघमारे (३५), रुक्मिणी वाघमारे (१४) अशी मायलेकींची नावे आहेत.
मरसांगवी (ता. जळकोट) येथील अजय वाघमारे यांची पत्नी कौसल्या व मुलगी रुक्मिणी या सकाळी ११ वाजता घरून नदी पलीकडे असलेल्या शेताकडे नदीपात्र ओलांडून जात होत्या. मात्र तिरु मध्यम प्रकल्पातून अचानक पाण्याचा विसर्ग वाढल्याने दोघीही पाण्यात वाहून गेल्याने दोघींचा मृत्यू झाला. मरसांगवी येथे शेताला जाण्याच्या ठिकाणी पूल असता तर ही दुर्घटना घडली नसती. पण अनेकवेळा मागणी करूनही पूल उभारण्यात येत नसल्याने शेतकरी व नागरिक यांना जीव धोक्यात घालून भर नदीपात्रातून शेताला ये-जा करावी लागत आहे.