

Karapa infestation on turmeric crop
ताडकळस, पुढारी वृत्तसेवा : यावर्षी सततच्या पावसाने हळद पिकांवर मोठ्या प्रमाणात कंदकुज, करपा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाची वाढ खुंटली. यामुळे उत्पादनात घट होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पावसाळ्यातही जास्त पाऊस पडला तरी परतीच्या पावसाने कहर केला व नंतर मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने हळद पिकावर कंदकुज, तांबोरा, पाने करपणे आणि सड अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला.
पूर्णा तालुक्यातील फुलकळस, ताडकळस, माहेर, माखणी, कळगाव, बाणेगाव, धानोरा काळे, खडाळा, महागाव, खांबेगाव, बलसा या शिवारात हळद लागवडीचे क्षेत्र वाढले. ऊस पिकांना जास्त पाण्याची गरज असते त्यापेक्षा कमी पाण्यात फायदेशीर उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी हळदची लागवड जास्त प्रमाणत केली.
या पिकांवर १ ऑक्टोंबरनंतर कंदकुज, तांबोरा, पानावर करपा, सड हे रोग आढळून येत आहेत. पानावर करपा लवकर येणारा तसेच उशिरा येणारा असे दोन प्रकार आहेत. यावर्षी दोनही पान करपे रोग एकाच वेळी आल्याने ४० ते ५० टक्के हळद पिकाचे नुकसान होऊ शकते. कंद माशीने हळदीचे कंद पोखरल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कंद कुजून सध्या धुके पडत असल्यामुळे हळद पिक पिवळे पडून कंदसड, करपा वाढला आहे.
यावर्षी सारखा पाऊस झाल्याने सर्वच पिकांचे नुकसान झाले. कृषी सहाय्यकांकडून शेतकऱ्यांना माहिती मिळावी, अशी मागणी हळद उत्पादकांतून होत आहे. परंतु हळद पिकांवरचे रोग आटोक्यात येत नाहीत, त्यामुळे आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे असे शेतकरी सुधाकर शिराळे म्हणाले. कंद कुजमुळे हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याची दोन्ही प्रकारचे हळदीवरचे करपे एकाच वेळी आढळून येत असल्याने कीड रोगाने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.
परतीच्या पावसानंतर धुके पड़णे, यामुळे हळदीवर करपा, खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढला. हळद पिकाना शेंगा लागण्याच्या अवस्थेत विविध रोगाने ग्रासल्याने त्रस्त आहेत असे शेतकरी रघुनंदन कदम म्हणाले. रोगांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशके, बुरशी नाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे असे शेतकरी देवानंद नावकीकर म्हणाले.
रोगाचा प्रादुर्भाव आहे. सुप्त अवस्थेतील हुमणी किडीच्या वाढीसाठी पोषक वातावरण मिळाल्याने हळदीसह अन्य पिकांवरही हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले असे शेतकरी आकाश शिराळे यांनी सांगितले.